जळगाव जिल्हा परिषदेच्या सोमवारी होऊ घातलेल्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याचे नियोजन केले होते. गेल्या दोन महिन्यापासून सभेची संधी शोधत असलेल्या शिवसेनेने सोमवारच्या सभेची तयारी केली होती.

दरम्यान, कोरोना आजराचे कारण पुढे करत सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षऐवजी ऑनलाइन सभेचा मार्ग काढत विरोधकांचे मनसुबे उधळून लावले.

जि.प.च्या या सदस्यांच्या कार्यकाळातील शेवटची सर्वसाधारण सभा ३ जानेवारीला आहे. अलिकडे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या मतभेदांमुळे विरोधकांना शेवटच्या सभेची प्रतीक्षा होती. शिवसेनंकडून भाजपला कोंडीत पकडण्याची तयारी सुरू होती.

दरम्यान, राज्यात कोरोना वाढल्याची बाब पुढे करून जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांनी त्यांच्या अधिकारात सभा ऑफलाइनऐवजी ऑनलाइन घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

त्यानंतर प्रशासनाने सर्व सदस्य व अधिकाऱ्यांना सोमवारच्या सभेबाबत मेसेज पाठवले. सोमवारी दुपारी १ वाजता सभा ऑनलाइन होईल. सभेच्या एक तास आधी सर्व सदस्यांना सभेचा मेसेज येणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

विरोधक देतील सभागृहात धडक
शेवटची सभा असल्याने विरोधी पक्षापैकी शिवसेनेचे सदस्य सोमवारी बैठकीच्या वेळेत सभागृहात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अध्यक्षा जिल्हा परिषदेतील त्यांच्या दालनातून सभेत सहभागी होतील. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य सभागृहात किंवा अध्यक्षांच्या दालनात जावून सभेत सहभाग नोंदवणार असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *