यावल-विरावलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दोघांना चावा; २ वर्षीय बालक जखमी

यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील विरावली येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दोन जणांवर हल्ला करून चावा घेतला. त्यात एका लहान बालकाचा समावेश आहे. दोघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

विरावली येथील माधव बुधो साळुंखे (वय ७६) हे घराच्या बाहेर होते. तर समर्थ पुंडलिक पाटील (वय २ वर्षे) हा बालक घराच्या बाहेर खेळत होता. यावेळी अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने दोघांवर हल्ला चढवला. त्यात दोघे जखमी झाले. यानंतर त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉ. प्रतीक तायडे, अधिपरिचारिका शीतल ठोंबरे, पिंटू बागूल आदींनी जखमींवर प्रथमोपचार केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरावली येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. ग्रामपंचायतीने पिसाळलेल्या आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. यामुळे त्यांच्या उपद्रवापासून सुटका होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.