रिड यावल प्रतिनिधी ::> मद्यालये खुली करणारे राज्य सरकार मंदिरे उघडण्याची परवानगी का देत नाही, असा प्रश्न उपस्थित करत सोमवारी भुसावळ टि-पॉइन्टवर अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने उपोषण करत आंदोलन केले. पोलिस व महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन निवेदन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मंदिर उघडण्याची परवानगी देण्यात आली मात्र, राज्य सरकारने ही परवानगी न दिल्याची तक्रार आंदोलकांनी केली. त्यामुळे मंदिरे तत्काळ खुली करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरिक्षक अरूण धनवडे, निवासी नायब तहसिलदार आर. के. पवार यांना निवेदन दिले. आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. सणावारांच्या काळात नागरिकांना धार्मिक विधींसाठी मंदिरात जावे लागते. मात्र, मंदिरे बंद असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मंदिरे तत्काळ खुली करावी, अशी मागणी बजरंग दलाचे मनोहर पाटील, सत्यानंद गुरु सेवानंद महाराज धुनीवाले यांनी केली.