यावल प्रतिनिधी >> शहरातील एकाच कुटुंबातील चौघांचे स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आले असून आजवर तालुक्यात ४६ प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे जाहीर करण्यात आले असून प्रशासनाने या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत.
यावल शहरातील फालक नगर परिसरात राहणार्या एकाच कुटुंबातील चार जणांचे स्वॅब चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दि, १४ जुन रोजी यावल तालुक्यातील फैजपुर १ आणि नायगाव येथे ३० वर्षीय रुग्ण आढळुन आल्याने आणखी २ बाधीत रुग्णांची संख्या वाढल्याने एकुण ९२ रुग्णसंख्या झाली असुन जिल्हा पातळीवरुन मात्र आज यावल तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या तीन दाखविण्यात आल्याने एकुण रुग्णसंख्याही ९३ दिसत आहे.
तालुक्यात एकुण ४६ प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आली असुन यात यावल शहर २० तर फैजपुर शहर आणि ग्रामीण क्षेत्र असे एकुण २६ प्रतिबंधीत क्षेत्र तालुक्यात आहेत. यात जेटीएम कोवीड सेन्टरला यावल व रावेर तालुक्यातील एकुण १२९ जणांना दाखल करण्यात आले आहे.
यावल तालुक्यातील एकुण ७७ जणांचे स्वॅब चाचणीचे अहवाल येणे अद्याप प्रलंबीत आहे. यातील एकही स्वॅब चाचणी अहवाल आज घेण्यात आलेले नसल्याचे यावल तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी उपरोक्त माहीती देतांना सांगीतले.
दरम्यान यावल शहरातील तिन दिवसाच्या जनता कर्फ्यूचा आज दुसर्या दिवशी ही व्यापारी बांधवांनी आपली सर्व व्यवसाय व दुकाने बंद ठेवुन कडकडीत बंद पाळला. फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले व तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी नागरीकांना लॉक डाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.