यावल : जुगार अड्ड्यावर छापा, पाच जण ताब्यात

क्राईम पाेलिस यावल

यावल ::> शहरातील हडकाई नदीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर येथील पोलिसांनी कारवाई केली. यात चार दुचाकीसह एक लाख ११ हजार रूपयांचा मुद्देमाल आणि पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली होती. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री करण्यात आली.

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना मंगळवारी मध्यरात्री हाडकाई नदीच्या पात्रात पत्ता जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हवालदार सिकंदर तडवी, राहुल चौधरी, सुशील घुगे या पथकास या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्याच्या सूचना केल्या.

या पथकाने केलेल्या कारवाईत झन्ना- मन्ना प्रकारचा जुगार खेळतांना अंकुश गोविंदा कोळी, विजय गणेश सोनवणे, शरद वसंत देशमुख, इसाक बिस्मिल्ला पटेल, गजानन दत्तू बारी यांना पकडले. त्यांच्याकडून ६ हजार ७०० रुपये रोख, पत्ता जुगाराची साधने, चार दुचाकी असा एकूण एक लाख ११ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तर या कारवाई दरम्यान बापू चौधरी हा फरार झाला आहे.

या प्रकरणी यावल पोलिसात पोलिस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी हे करीत आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे.