यावल-चितोडा-फैजपूर रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक, ३ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

अपघात क्राईम फैजपूर यावल

यावल प्रतिनिधी ::> येथील फैजपूर रस्त्यावर यावल-चितोडा दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक होऊन तीन जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावला हलवले आहे.

गिरडगाव, ता. यावल येथील रहिवासी गुलशेर नजीर तडवी (वय ३०) व त्यांची आई सलमाबाई नजीर तडवी (वय ५५) हे दोघे रविवारी दुचाकीद्वारे फैजपूरहून यावलकडे जात होते. तर सुमेरसिंग पांड्या बारेला (वय ३५) रा.पाल, ता. रावेर हा दारूच्या नशेत दुचाकीने भरधाव वेगात यावलकडून फैजपूरकडे जात होता.

या रस्त्यावरील चितोडा गावाजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास बारेला यांनी तडवी यांच्या दुचाकीस समोरून जबर धडक दिली. यात दोन्ही दुचाकींवरील तिघे जण जखमी झाले. घटनास्थळावरून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, डॉ.मयुर चौधरी, डॉ.इरफान खान, परिचारिका आरती कोल्हे, पिंटू बागुल, प्रवीण बारी आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. यातील गुलशेर तडवी व सुमेरसिंग बारेला या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी येथून नेण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच पोलिस कर्मचारी राेहील गणेश, विजय परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या.

दारूमुळे दुसऱ्यांदा अपघात
गेल्या आठवड्याभरात दारूच्या नशेत हा दुसरा अपघात घडला आहे. दारू पिऊन बेदरकारपणे दुचाकी वाहन चालवल्याने या पूर्वी एकाचा बळी गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर येथील पोलिसांकडून दारू पिऊन वेगाने वाहने नेणाऱ्यांची तपासणी व्हावी अशी मागणी होत आहे.