यावल न्यायालयाच्या कर्मचाऱ्याने गैरहजर असताना हजेरी पटावर केली खाडाखोड ; गुन्हा दाखल

क्राईम चोरी, लंपास निषेध यावल

यावल >> येथील न्यायालयातील फसवणूक प्रकरणातील संशयित कर्मचाऱ्याविरुद्ध पुन्हा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. पूर्वी या कर्मचाऱ्यांवर खोट्या मेडिकल बिलांसंदर्भात गुन्हा आहे. आता त्याने गैरहजर असताना हजेरी पटावर खाडाखोड व स्वाक्षऱ्या करत कार्यालयाची फसवणूक केली. न्यायाधीशांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

येथील प्रथमवर्ग न्यायालयातील न्या.डी.जी. जगताप यांनी येथील पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार न्यायालयातील लिपिक विजय पंढरीनाथ सूर्यवंशी रा. पुष्कराज अपार्टमेंट, भुसावळ हे १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत न्यायालयात हजर नव्हते. त्यांची कार्यालयात गैरहजेरी लावलेली असताना त्यांनी कार्यालयातील हजेरी पटावर खाडाखोड व सह्या करून कार्यालयाची फसवणूक केल्याचे चौकशीतून समोर आले.

या प्रकरणी येथील पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरिक्षक अजमल पठाण करत आहेत. न्यायालयात नोकरी करताना अशाप्रकारे न्यायालय व शासनाच्या फसवणुकीचा हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.