पाचोरा : नगरदेवळा परिसरात वाळूमाफियांचा सुळसुळाट तर बेसुमार वाळू उपसा सुरू

पाचोरा

नगरदेवळा ता. पाचोरा प्रतिनिधी : >> परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू विक्रीचा धंदा बोकाळला असून वाळू तस्कर कुणालाही न जुमानता आजूबाजूच्या नदीपात्रातून व शासन जमा असलेल्या साठ्यावरून बेसुमार वाळू उपसा करीत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

सर्व वाळू तस्कर हे नागरिकांना रात्रीच्या वेळी वाळू विकत असल्याने सध्या गावात रात्रीस खेळ चालत आहे. तालुक्यातील कुठल्याही वाळू ठेक्याचा जाहीर लिलाव झालेला नाही. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने संबंधित महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांचा छुपा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षी शासकीय कामासाठी वाळू लागत असल्याचा बनाव करीत जवळपास ७०० ब्रास वाळू गावातील महाभागांनी अगणावंती धरणातून वाळूचोरी करून विविध ठिकाणी साठा केला होता.

महसूल प्रशासनाने त्याचा फक्त पंचनामा करून वाळूउचल करणार्यांना नोटीस दिल्या होत्या परंतु यात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

याउलट याच धरणा लगत केलेल्या साठ्यावरून काही वाळूचोर वाळूविक्री करीत आहेत परंतु मंडळधिकारी, तलाठी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.

मंडळअधिकारी, तलाठी, कोतवाल हे एकही मुख्यालयी राहत नसल्याने सुरू असलेल्या या वाळूचोरीच्या धंद्यातून लाखो रुपयांची कमाई वाळूतस्कर करून घेत आहेत या वाळू वाहतुकीमुळे अनेक रस्त्यांची वाट लागली आहे.

तसेच भडगाव गिरणा पत्रातून रात्रीच्यावेळी वाळू चोरून आणली जाते व ही वाळू अव्वाच्या सव्वा भावाने नागरिकांना विकल्या जात आहे.

वाढत्या वाळूचे भाव बाबत संबंधित वाळू तस्करांना विचारले असता प्रशासनाला मोठ्या प्रमाणात हप्ते द्यावे लागतात म्हणून वाळू जादा भावाने द्यावी लागत असल्याचे ते सांगत आहेत.

गावात सुरू असलेल्या अवैध वाळू व्यवसायाला पूर्णपणे महसूल व पोलिस प्रशासनाचे अभय असल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

तरी याकडे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तातडीने लक्ष देण्याची गरज असून अशा लाचखोर कर्मचारी व अधिकार्‍यांना वेळीच आवर घालायला पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *