ट्रिपल तलाक कायद्याचे उल्लंघन; भुसावळात पतीसह ७ जणांवर गुन्हा

क्राईम निषेध भुसावळ

नवीन कायद्यानुसार पहिलाच गुन्हा दाखल
भुसावळ >> मुल होत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी छळ केला. त्यातच पतीने तीन वेळा तोंडी तलाक दिला. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरकडील ७ जणांविरुद्ध विनयभंग, हुंडा प्रतिबंधक कमल व मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकारचे संरक्षण कायदा २०१९ चे कलम ४ नुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे १.३९ वाजता गुन्हा दाखल झाला. शहरात दाखल झालेला या प्रकारचा हा पहिलाच गुन्हा आहे.

शहरातील आझाद नगरातील सिद्धेश्वर मंदिराजवळील रहिवासी कुटुंबातील विवाहितेचा सासरकडील मंडळींनी १० मार्च २०१९ ते १० एप्रिल २०२१ या काळात शारीरिक व मानसिक छळ केला. तुला येथे सुखाने नांदायचे असेल तर सर्व सहन करावे लागेल, असे घरातील ज्येष्ठांनी वारंवार सांगितले. फिर्यादी महिला व तिच्या पतीला वेगवेगळ्या खोलीत ठेवून आपसात बोलू देत नव्हते.

१० एप्रिलला फिर्यादीच्या सासरी बहुसंख्य नातेवाईकांना सकाळी ११.३० वाजता बोलावले होते. सर्व जमा झाल्यावर महिलेची आई, काका यांनाही बोलावले. यावेळी पतीने सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून सर्वांसमोर पत्नीला ‘आम्ही तुला मुस्लीम धर्म रीतिरिवाजाप्रमाणे तलाक दिला आहे’ असे सांगितले.

तसेच कोऱ्या स्टॅम्पवर विवाहितेच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. महिलेच्या भाच्याने विवाहितेचे फोटो समाजात दाखवून बदनामी करेल. तुझ्या भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक अधीक्षक अर्चीत चांडक यांनी घटनेची माहिती घेतली. हवालदार जितेंद्र पाटील तपास करत आहे. दरम्यान, तीन तलाकचा हा भुसावळातील पहिलाच गुन्हा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.