शुक्रवारी एलसीबीची कारवाई
वरणगाव ::> कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ३४ गुरांची शुक्रवारी पोलिसांनी वरणगावात सुटका केली. गुरांची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे.
वरणगावातील प्रतिभानगर भागात एका गोठ्यात कत्तलीला नेण्यासाठी गुरे आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखेचे राजेश मेढे, संजय हिवरकर, शरद भालेराव, निजामुद्दीन शेख, संजय सपकाळे, सूरज पाटील, किरण धनगर आदींनी वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, कॉन्स्टेबल मनोहर पाटील, सहायक फौजदार सुनील वाणी यांच्या मदतीने पाच लाख दहा हजार रुपये किमतीचे ३४ गुरांची सुटका केली.
गुरांना निर्दयीपणे बांधून ठेवलेले होते. हा गोठा शेख मुकिम शेख यासीन (रा. प्रतिभानगर) यांच्या मालकीचा होता. याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.यापुर्वीदेखील वरणगावातून कत्तलीसाठी गुरे नेले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे पोलिसांनी कायदा मोडणाऱ्यांचा बंदोबस्त करावा.