चोपडा वर्डीतील वीज कार्यालयाला ठोकले कुलूप ; रोहित्र मिळत नसल्याने संताप

आंदोलन चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> जळालेले दोन ट्रान्स्फॉर्मर बदलून देण्यासाठी तीन महिन्यांपासून विनंती करूनही उपयोग होत नसल्याने वर्डी येथील शेतकरी संतप्त झाले. दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारी वाढल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांनी शेतकऱ्यांसह वर्डी येथील वीज कंपनीच्या कार्यालयास मंगळवारी कुलूप ठोकले.

वर्डी येथील १२ आणि ७ क्रमांकाचे रोहित्र जळाले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी शाखा अभियंता बाविस्कर यांच्याकडे तीन महिन्यांपासून तक्रार केली आहे. वीज पुरवठ्याअभावी कांदा बी पाण्याअभावी जळून गेले. फवारणी देखील करता आली नाही, अशा अनेक समस्या शेतकऱ्यांनी शाखा अभियंत्यांकडे मांडल्या. मात्र, त्यांनी रोहित्राबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आहे, असे सांगितले. दरम्यान, वरिष्ठ अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे, तर राज्याला रोहित्र (डीपी) पुरवठ्याचा ठेका दिलेली इन्फ्रा कंपनी अधिकाऱ्यांचे ऐकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न उपस्थित झाला.

यानंतर माजी जि.प.सदस्य विजय पाटील व संतप्त शेतकऱ्यांनी गावातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास कुलूप ठोकले. यानंतर तेथे आलेले अभियंता बाविस्कर यांना जाब विचारला. यावेळी डॉ.कांतीलाल पाटील, लहु धनगर, श्याम नायदे, गणेश पाटील, राहुल पाटील, महेंद्र पाटील, प्रदीप शिंदे व शेतकरी उपस्थित होते.