धुळे प्रतिनिधी >> साक्री तालुक्यातील कासारे येथील रहिवासी आरिफ हबीब पिंजारी (वय २८) या तरुणाने मेहेरगाव येथे राहत्या घरी गळफास घेतला. घटनेच्या वेळी त्याची पत्नी बाहेर गेली होती. ती परत आल्यावर आरिफ ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉ.अजय पावरा यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी मनोहर बना पिंजारी (वय ४०) यांच्या तक्रारीवरून सोनगीर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत दोंडाईचा येथील शिवाजीनगरात सतीश रमेश मराठे (वय ३५) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून घेतला. बुधवारी हा प्रकार समोर आला. हरेश रमेश मराठे यांच्या माहितीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. तिसऱ्या घटनेत चिमठाणा शिवारात दादाभाऊ बापू पाटील (वय ३५) या तरुणाने गळफास घेतला. शेडमधील लोखंडी अँगलला त्याने गळफास लावला होता. रुग्णालयात दाखल केल्यावर त्यास मृत घोषित करण्यात आले. शिंदखेडा पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.