मंदिरातील सोनं….

Politicalकट्टा ब्लॉगर्स कट्टा

आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंदिरांच्या सोन्याविषयी वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटले. आपण सर्वांनी जर त्यांचा तो व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल कि मंदिरातील सोनें हे व्याजाने सरकारनी घेतले पाहिजे म्हणजेच सरकारनी सध्याच्या कोरोनाच्या युद्धामध्ये गरज म्हणून ते उसने म्हणून घेतलं पाहिजे पण त्याच व्याज हे मंदिरांना दिल पाहिजे आणि गरज संपली कि घेतलेले सोनं मंदिरांना वापस हि केलं पाहिजे असा त्यांचा व्यक्तव्याचा हेतू होता. हे वक्तव्य करण्याची त्यांना गरज पडली कारण सध्या आपलं राज्य सरकार हे आर्थिक अडचणींचा सामना करत आहे त्यात उद्योगधंदे आणि महसूल देणारे क्षेत्र सुद्धा बंद असल्यामुळे राज्याची आर्थिक घडी हि विस्कटलेली आहे त्यात कोरोनाचा सामना करताना पैसा सरकारी तिजोरीत उपलब्ध नसल्यामुळे कदाचित आवश्यक त्या उपाययोजना करताना सरकारला अडचण येत असावी. त्यांनी जे व्यक्तव्य केलं त्या मागचा उद्धेश हा चांगला आहे यात शंका नाही. हि झाली एक बाजू दुसरी बाजू पण मी या लेखाच्या शेवटी मांडणार आहेच. पण काही लोक राज्यात काही संकट आले कि मंदिर आणि त्यातील पैसा यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. त्या प्रश्नाचा समाधान करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

मंदिर हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, प्रत्येक जणांची(नास्तिक सोडून बर) कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा.. आणि श्रद्धा असण्यामागचा हेतू का तर देव आपल्या पाठीशी असल्यावर आपण कोणत्याही संकटाशी सामना करू शकू हा मानसिक आधार आणि बळ मिळण्याचं काम त्या निमित्याने होत असत. मानसिक आधार किंवा मानसिक बळ, आत्मविश्वास हे आर्थिक आणि शारीरिक बळापेक्षाहि जास्त महत्वाचं असत हे प्रत्येक गोष्टीला पैशात मोजणाऱ्याना आणि त्याकडे संशयाने बघणाऱ्याना काय कळणार? बर ते श्रद्धा, देव-देव फक्त आपल्या जाती-धर्मात आहे का तर नाही.. मुस्लिम बांधवांची अल्लावर श्रद्धा आहे, ख्रिश्चन बांधवांची येशुवर, जैन बांधवांची महावीर यांच्यावर, बौद्ध बांधवांची गौतम बुद्ध यांच्यावर श्रद्धा आहे.. प्रत्येक धर्मांची आपआपली प्रार्थनास्थळे आहेत आणि त्या त्या धर्माची लोक तिथे जाऊन भक्तीभावाने दर्शन घेतात आणि जे घडेल ते देत असताना किंवा दानधर्म करत असतात. याला तुम्ही श्रद्धा-अंधश्रद्धा जे म्हणायचं ते म्हणू शकता हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे. बर देव देव दानधर्म प्रत्येक जण आपआपल्या मर्जीने करत असतो.. यात कोणतेच प्रार्थना स्थळ (मग ते कोणत्याही धर्माचे असू द्या) हे इथेच आलं पाहिजे, इतकेच पैसे दिले पाहिजे अशी जबरदस्ती करत नाही किंवा केलेलं माझ्या तरी ऐकण्यात नाही. मंदिरात दिले जाणारे दान जे आर्थिक व इतर स्वरूपात असते त्याची नोंद हि होत असते. तसेंच जवळपास सर्वच प्रसिद्ध मंदिरावर ट्रस्टी/प्रतिनिधी म्हणून सरकारचा एक प्रतिनिधी असतो जो या पूर्ण व्यवहारावर नजर ठेऊन असतो आणि त्याच ऑडिट होत असते त्यामुळे सोने नाणे आणि पैस्याची हेराफेरी होणं हे अशक्य आहे.जे पैसे जमा होतात त्यामधून बऱ्याच मंदिरांनी अन्नछत्र चालूं केलेले आहेत त्यातून येणाऱ्या भाविकांना आणि गरजूना मोफत जेवण किंवा माफक दरात जेवण मिळेल अशी व्यवस्था केली आहे तसेच भक्तनिवास बांधून येणाऱ्या भक्तांच्या राहणायची सोय कमी पैस्यात किंवा मोफत केलेली आहे. प्रत्येक संकटकाळी कितीतरी मंदिरांनी मुख्यमंत्री साहय्यता निधीमध्ये पैसे हि जमा केलेले आहेत. असच इतर धर्माच्या प्रार्थना स्थळाबाबतीत आहेच, त्यांचेहि कार्य असेच आहे यात शंका नाही.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चालू झालेल्या आरोपामध्ये काही प्रश्न उपस्थित केले गेले त्यात आरोप करणारे काही आपल्याच धर्माचे होते हे विशेष.. एक तर देवाला मानायचं नाही मंदिरात हि जायचं नाही त्यामुळे तिथे काही देण्याचा प्रश्नच नाही.. पण बोलताना तोरा असा कि जस त्यांच्या पूर्वजांनीच मंदिर बांधले आहेत आणि त्यांनी पैसे मागितल्या मागितल्या मंदिरानी त्यांच्या समोर तिजोऱ्या रिकाम्या केल्या पाहिजे आणि हे मागताना जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. अशा लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे कि मंदिरातील पैसा हा जनतेचाच आहे यात शंका नाही म्हणून तर कोरोनाशी लढण्यासाठी बऱ्याच मंदिरांनी पैसे हि दिले आहेत काही नि जागा दिली तर काहींनी अन्नछत्र चालू करून गोरगरीब लोकांच्या अन्नपाण्याची सोय केली आणि करत आहेत. आणखी काही जणांनी आरोप केले कि मंदिराचे पुजारी यांचा सोन्यावर डोळा आहे किंवा पुजारी सोनं देणारं नाहीत अस तस. अशे आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्या जे देणगी स्वरूपात सोनं जमा होत ते एकतर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्या जात किंवा मंदिराच्या तिजोरीमध्ये.. मंदिराचा पुजारी किंवा त्यांच्या बायका पोर-सुना ते सोनं अंगावर मडवून गावभर हिंडत नाहीत. त्यामुळे सरकारला हवं त्यावेळी सोनं ते घेऊ शकतील कारण त्यांचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून तिथे आहेच. त्यामुळे उगच मंदिराच्या नावाने बोंबा मारू नये हि नम्र विनंती. तसेच काही इतर धर्मांचे लोक हे हिंदू धर्माचे मंदिर,त्यांचे सण, त्यांच्या परंपरावर सतत टीका करत असतात त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे कि मंदिर जरी आमच्याकडे असतील तर तुमच्याकडे सुद्धा तुमची प्रार्थना स्थळे आहेतच त्यात पैसे व इतर दानधर्म होत असतोच तसेच हिंदूंच्या सणाला परंपरेला जर अंधश्रद्धा म्हटलं तर तुमच्याही सण,परंपरा, संस्कृतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा राहीलच ना?त्यामुळे धर्मा-धर्मामध्ये वाद उभा राहतील पण अस होणार नाही. कारण तुमच्या सारखे आगंतुक सोडले तर बाकीचे सर्वजण एकमेकांच्या धर्माचा आणि त्यांच्या परंपरेचा आदर करतात आणि म्हणूनच प्रत्येक सणाला एकमेकांना शुभेच्छा देत असतात हे लक्षात ठेवा.

लेखाच्या सुरवातीला जस मी लिहिलं आहे तस पृथ्वीराज चव्हाण यांचा उद्धेश हा बरोबर होता आपल्या राज्यात काही मंदिर हे खूप श्रीमंत आहेत त्यांनी जरूर मदत केली पाहिजे यात काही वावगं नाही पण आता आपण दुसऱ्या बाजूचा विचार करूया. आपल्या राज्यात मंदिरापेक्षा सुद्धा किती तरी पटीने देशातील आणि राज्यातील राजकारणी,पुढारी हे श्रीमंत आहेत कि जर त्यांनी सुद्धा पैसे व्याजाने दिले तरी चालू शकेल ना?, जर मग चव्हाण साहेबांनी राजकारणी लोकांना विनंती केली तर मंदिरापेक्षा सुद्धा जास्त पैसा जमा होईल हे मात्र नक्की आणि त्यांनी पैसे द्याला काय हरकत आहे नाहीतरी बऱ्याच राजकारण्याकडचा पैसा हा जनतेचाच आहे, त्यांनी कुठे कष्टाने, घाम गाळून, शेतात काम करून मिळवला आहे?नुसते घोटाळे करून आणि सरकारी योजनेच्या पैशाने स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या आहेत..जर नेत्यांनी एकत्र येऊन पैसे जमा केले तर त्यातून त्यांना किती तरी फायदे होतील एक तर जनतेची सेवा होईल दुसर म्हणजे त्याच व्याज हि मिळेल तिसरं म्हणजे लोकांची सहानभूती मिळल्यामूळे निवडणुकीत पैसा-दारू वाटायचं काम हि पडणार नाही आणि महत्वाचं म्हणजे जनतेचा पैसा लुटून जे पाप केले आहेत ते पाप जरा कमी होईल व आयुष्यात कधीतरी चांगलं काम केलं म्हणून समाधान लागेल आणि झोप हि शांत मिळेल.

बरेच लोक आणि काही पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर मंदिरांची श्रीमंती व त्यांचे पैसे मोजत असतात. त्यांनी जरा आपल्या नेत्याकडे पाहिलं पाहिजे, काही पीडिजात गर्भश्रीमंत आणि प्रामाणिक राजकीय नेते सोडले तर बरेच नेते भ्रष्टाचारी आहेत.5 वर्षांपूर्वी दुचाकीवर 100 च पेट्रोल टाकून फिरणारा आपला नेता आज 15 लाखाच्या गाडीतून फिरतोच कसा? कितीतरी राजकारण्यांचा इतिहास जर काढला तर आपल्याला कळेल कि काही शेती करत होते, काही टॅक्सी,ऑटो, काही जण कुणाच्या तरी दुकानावर काम करत होत, कुणी गुंड होत तर काही जणांच्या घरची परिस्थिती 1 वेळेच्या जेवण्याला पण महाग होती मग त्यांच्याकडे इतका पैसा आलाच कुठून? प्रत्येक 5 वर्षाला हा पैसा डबल टिबल किंवा त्यापेक्षा जास्त पटीने वाढतो हे होतच कसा? अशी पैश्याची वाढ हि एखाद्या व्यापाऱ्याची, आइ टी सेक्टर किंवा इतर ठिकाणी लाख रुपयापेक्षा जास्त पगार घेणाऱ्यांचा पण होत नाही मग यांचीच संपत्ती इतकी का? पण काहींना दिसतात ते फक्त मंदिर..जितका जोर मंदिरावर बोलण्यात जातो ना तितकाच जोर जर आपले मूलभूत प्रश्न काही भ्रष्टाचारी नेत्याला विचारण्यात लावला असता तर आज आपला देश हा विकसनशीलच्या जागी विकसित म्हणून गणला गेला असता पण मतदानाच्या वेळी 500 रुपायात इमान विकणारे लोक आपल्या नेत्याला काय विचारणार?नेत्याच्या मागेपुढे फिरणारे आणि त्यांच्यासमोर लाळ गाळणारे काही कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांना काय विचारणार? त्यांचा जोर फक्त हिंदूंची मंदिरे, त्यांचे सण,त्यांची संस्कृती यावर बोलण्यातच लागतो आणि अस बोललं कि सुधारणावादी पुरोगामी म्हणून हे मिरवायला मोकळे..

शेवटी इतकंच वाटत चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी किती तरी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते कितीतरी हजार कोटीच्या घरात आहेत त्यांची चौकशी आणखी चालूच आहे.. आणि प्रत्येक सरकारच्या काळात मग ते कोणत्याही पक्षाचं असो बऱ्याच नेत्यांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तर काही लोकांनी बँकेत घोटाळे करून विदेशामध्ये पळ काढलेला आहे. मला वाटत मंदिरातील सोनें सरकारनी घेण्यापेक्षा अशा नेत्यांच्या, कर्मचारी अधिकारी आणि पळून गेलेल्या लोकांच्या केस या 3 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये निकाली काढल्या पाहिजे कारण त्यांच्याकडून जमा होणारा पैसा हा आपल्या देशाचं आणि सर्व राज्याचे सर्व कर्ज़ फेडून कोरोनासारख्या 10 विषाणूला पुरून उरेल हे मात्र नक्की…


राम भानुदासराव खडके
ता. मंठा जी. जालना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *