औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नगरसह ७ जिल्ह्यांतील तलाठी पदे भरणार

Aurangabad Politicalकट्टा कट्टा धुळे नंदुरबार महाराष्ट्र माझं खान्देश रिड जळगाव टीम

मुंबई >> औरंगाबाद, बीड, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्यामुळे एसईबीसी प्रवर्ग वगळता ही भरती करण्यात येणार आहे.

नियुक्तीबाबत मान्यता मिळाली
सात जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायास अनुसरून ७ जिल्ह्यांतील सन २०१९ तलाठी पदभरतीतील एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा ७ जिल्ह्यांतील सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत कळवण्यात आले आहे.

२६ जिल्ह्यांत प्रक्रिया पूर्ण
सन २०१९ मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यापूर्वी राज्यातील २६ जिल्ह्यांतील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

तर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर व पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यांत तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना वित्त विभागाने ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र ही भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरू करण्यात आली असल्याने उर्वरित ८ जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांसंदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही. त्यामुळेच ८ जिल्ह्यांतील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश निर्गमित करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.

नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तथापि, सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २० रोजी आदेश पारित करून एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी नियुक्ती आदेश पारित केले आहेत.