”ती निघाली बांधायला आयुष्यगाठ, प्रियकराने फिरवली सोयीने पाठ!”

क्राईम धुळे निषेध पाेलिस माझं खान्देश

लग्नाचे आमिष दाखवून बसवले होते बसमध्ये

धुळे प्रतिनिधी >> लग्नाचे आमिष दाखवून बसमध्ये बसवलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी सोमवारी सकाळी सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पालक सुरतच्या दिशेने रवाना झाले. या वेळी मुलींचे पालक पोलिसांचे आभार मानण्यास विसरले नाही.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी रात्री नेहमीप्रमाणे बस उभ्या होत्या. या वेळी दोन अल्पवयीन मुली कोपऱ्यात बसून रडत होत्या. हा प्रकार बंदोबस्तावर असलेल्या दोन पोलिसांच्या लक्षात आला.

पोलिसांना पाहून मुली भेदरल्या. या वेळी पोलिसांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी महिला कर्मचाऱ्यांना पाठवले. त्यानंतर दोन्ही मुलींना पोलिस ठाण्यात आणले.

तसेच त्यांच्या जेवणाची सोय केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर दोघांची नावे व खरा प्रकार सांगितला. दोन्ही मुली गुजरात राज्यातील कोरली गावातील आहे.

दोघांपैकी एका मुलीची गावातील मुलासोबत ओळख होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीला सुरतला बोलावले. घरातून बाहेर पडताना या मुलीने मामाच्या १२ वर्षीय मुलीलाही सोबत घेतले होते.

सुरत बसस्थानकात आल्यावर दोघा मुलींना धुळे बसमध्ये बसवून मुलाने लग्नास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी मुलींच्या पालकांशी संपर्क साधला. ते शहरात आल्यावर त्यांच्याकडे दोन्ही मुलींना सोपवण्यात आले. मुलींना रागावू नका, प्रेमाने आधार द्या, असे सांगण्यास पोलिस विसरले नाही.