चारित्र्यावर संशय घेतल्याने विवाहितेची आत्महत्या

Jalgaon Jalgaon MIDC आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

प्रतिनिधी जळगाव >> पती चारित्र्यावर संशय घेऊन जाच करीत असल्यामुळे एका विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजता वानखेडे हौसिंग सोसायटी येथे घडली. विवाहितेच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कविता योगेश नेटके (वय ३०, रा. वानखेडे हौसिंग सोसायटी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. कविता यांचे वडील मधुकर वानखेडे (रा. मेहरूण) यांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता व योगेश पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते.

योगेश चारित्र्यावर संशय घेऊन सतत तिचा छळ करीत होता. या जाचास ती कंटाळली होती. मंगळवारी सकाळी ९ वाजता कविता यांनी बाथरूममध्ये विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना उघडकीस येताच कुटुंबियांनी तिला अत्यवस्थ स्थितीत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दुपारी १२ वाजता त्यांचा मृत्यू झाला. तिचा पती योगेश याच्या जाचास कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप मधुकर वानखेडे यांनी केला आहे.

कविता व योगेश या दाम्पत्यास सिद्धेश (वय १२) व मोहित (वय ८) अशी दोन मुले आहेत. या घटनेमुळे मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले. घटना उघडकीस आल्यानंतर कविताच्या माहेरच्यांनी रुग्णालयात आक्रोश केला. या वेळी रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. योगेश नेटके विरुद्ध संताप व्यक्त करीत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.