कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

क्राईम पारोळा सिटी न्यूज

 पारोळा ::>लॉकडाऊन काळात वाहन कर्ज फिटत नसल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील म्हसवे येथील आयशर गाडीचे ३० वर्षीय मालकाने २६ रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

कोरोनाच्या भीषण काळात घेतलेल्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नाहीत, वाहनांचा व्यवसाय आजही ठप्प झाला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून वाहन घरीच उभे आहे, कुठलीही भाडे नाही, अशा परिस्थितीत वाहनावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत होते.

 त्यातच कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न होता. त्यामुळे कर्ज फिटेल कसे? या चिंतेत असलेल्या म्हसवे येथील आयशर गाडीचे मालक भूषण अनिल पाटील (वय ३०) हे २६ सप्टेंबरला सकाळी कुणालाही काही न सांगता घरून निघून गेले.

तर भूषण पाटील हे दुपारपर्यंत घरी आले नसल्याने त्यांचा शाेध घेण्याचा प्रयत्न केला असता म्हसवे शिवारातील भगवान शिवराम चौधरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.

 गावातील शुभम पाटील, दीपक पाटील, अरुण पाटील यांनी लगेच त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

भूषण पाटील यांच्या पश्चात पत्नी, आई-वडिल व दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. संभाजीराव पाटील यांनी खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *