सुविधांअभावी कोरोनामुळे जनतेचे होणारे हाल थांबवा – भाजप

Jalgaon Politicalकट्टा कट्टा कोरोना जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> जिल्ह्यातील जनतेचे कोरोनामुळे हाल होत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड मिळत नाहीत. दुसरी लाट येणार असल्याचे माहिती असतानाही राज्य सरकारने नियोजन केले नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही; पण आम्ही त्रुटी दाखवत आहोत. त्यामुळे पाचव्यांदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. खासगी रुग्णांमध्ये होणारी लूट थांबली पाहिजे. लोकांचे हाल थांबवण्याची प्रशासनाची जबाबदारी आहे. सुविधांअभावी लोकांचे हाल थांबले नाही तर भविष्यात काही उद्रेक झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दिला आहे.

खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच जिल्ह्यातील परिस्थिती व अडचणींबाबत चर्चा केली.

या वेळी अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण उपस्थित होते. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी आमदार भोळे म्हणाले की, अपुऱ्या सुविधांबाबत मदत करण्यास तयार आहोत. निधीची अडचण असल्यास वैयक्तिक पैसा जमा करून पैसे देण्यास तयार आहोत, असे सांगितले.