साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेच्या माध्यमातून वातावरण बनले ‘ शिवमय !’

Social कट्टा कट्टा यावल रिड जळगाव टीम साकळी

● दोन दिवसीय स्पर्धा
● स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ ठरले ‘ एकमेव ‘

साकळी ता.यावल- येथील जय दुर्गा मित्र मंडळ, बाजारपेठ या मंडळाच्या वतीने दुर्गा उत्सवानिमित्ताने दि. २३ व दि. २४ अशा दोन दिवसिय ‘ घरीच किल्ले बनवा स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा तब्बल ३५ तासांच्या जवळपास चालली. अतिशय अभिनव व नाविन्यपूर्ण संकल्पितस्पर्धा मंडळाच्या वतीने ‘ पहिल्यांदाच ‘ राबविली जात आहे. तर गावातही अशा प्रकारची स्पर्धा राबवणारे जय दुर्गा मित्र मंडळ हे ‘ एकमेव ‘ मंडळ ठरले आहे.या स्पर्धेमुळे बाजारपेठेभाग अक्षरशः शिवमय वातावरणाने भारावून गेलेला होता. कोरोना आजाराचा संसर्ग लक्षात घेऊनच ही स्पर्धा घरोघरी राबवण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या होता.

तर मग…..चला आपण आपल्या घरीच कुटुंबासंगे “गड-किल्ला” बनवूया!

या ‘ टॅगलाईन ‘ खाली सुंदर गड-किल्ले बनवा स्पर्धा-२०२० घेण्यात आली. या स्पर्धेत अकरा स्पर्धकांनी भाग घेऊन ” शिवप्रिय ” शिवनेरी तोरणा,रायगड, राजगड, जलदुर्ग जंजिरा, प्रतापगड अशा विविध प्रकारच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती दगड ,माती,विटा,गोणपाट यासह विविध पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून साकारण्यात आल्या.

या स्पर्धेत कु. साची जैन, वेदांत नेवे, गितेश नेवे, अथर्व नेवे, आदित्य नेवे, भुवन नेवे, पियुष वाणी ,आदित्य नेवे, भुवनेश नेवे,कु. भाविका नेवे, कुणाल नेवे या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही अनोखी स्पर्धा राबविल्याने मंडळाच्या कार्यक्षेत्रात उत्साहाचे व नवचैतन्याचे तसेच घराघरात ‘शिवमय’ वातावरण निर्मिती झाल्याची अनुभूती येत होती.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २४ रोजी किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण करून अप्रतिम असे सजवण्यात आले.गड- किल्ले बनवितांना त्या वास्तूतील बारकावे जसे गुप्तद्वार, गुप्तवाट, मुख्यरस्ता,खंदके, बुरुज, तळमाथा, पाण्याची व्यवस्था, मजबूत तटबंदी, पायथ्याशी असलेले गाव, घनदाट जंगल यासह सर्व बारीकसुरीक बाबीं दाखवण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शिवअभ्यासकांच्या उपस्थित परीक्षण केले.

यानंतर गड-किल्ले शिवप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. मंडळाच्या महिला पदाधिकारी सौ. शुभदा दामोदर नेवे व सौ.रोहिणी योगेश नेवे यांच्याकडे स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आलेली होती. स्पर्धकांनी स्पर्धेत उत्तम असा सहभाग नोंदवून छत्रपतीं शिवरायांच्या पावन व अजरामर इतिहासाला उजाळा दिला. तसेच किल्ले पाहतांना नागरिकांनी सुद्धा तोंडाला मास्क लावून तसेच योग्य असे सोशल डिस्टन ठेवले.