शिरपूर >>चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील सांदिपनी कॉलनीतील माहेर असलेल्या सोनाली संदीप मगर यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील संदीप मोहन मगर यांच्याशी झाला होता.
सोनाली मगर या औरंगाबाद येथे पती संदीप मगर, सासरे मोहन मगर व सासू इंदुबाई मगर यांच्यासह एकत्र राहत होत्या. काही महिन्यांनंतर पती संदीप मगरची नांदेडला बदली झाली.
सोनालीने त्याच्यासोबत जाण्यासाठी आग्रह केला. मात्र, त्याने नकार देत आई-वडिलांसोबत औरंगाबादला रहा, असे सांगितले.
दरम्यानच्या काळात सासू व सासरे सोनालीच्या चारित्र्यावर संशय घेत असत. तसेच नाशिक येथे राहणारी सोनाली मगर यांची नणंद सरिता भूषण कोळी औरंगाबाद येथे येऊन शिवीगाळ करायची.
तसेच २५ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता नणंद सरिता कोळी, सासू इंदुबाई मगर, सासरे मोहन मगर व पती संदीप मगर यांनी स्वयंपाक करता येत नाही, असे म्हणत सोनालीला शिवीगाळ करत मारहाण केली.
तसेच चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाकलून दिले. सोनालीचा भाऊ सागर वाकडे याला फोन करून तिला घेऊन जावे असे सांगितले. सोनाली मगर यांना दहा महिन्यांची मुलगी आहे.
या प्रकरणी सोनाली मगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती संदीप मोहन भगर, सासू इंदुबाई मोहन मगर, सासरा मोहन शेनपडु मगर व नणंद सरिता भूषण कोळी यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.