शेंदुर्णीच्या कोरोना बाधित रुग्ण महिलेला तीन दिवसात डिस्चार्ज ?

शेंदुर्णी

जामनेर >> शेंदुर्णीतील महिला पहूर ग्रामीण रुग्णालयात २९ रोजी दाखल झाली. संबंधित वैद्यकीय अधिका-यांनी या महिलेला संशयित रुग्ण म्हणून जळगाव कोविड रुग्णालयात रवाना केले. बाधित महिलेच्या चाचणी अहवालाला तीन दिवसही उलटले नसताना जळगाव कोविड रुग्णालयातून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अवघ्या तीन दिवसांच्या आत महिलेचा डिस्चार्ज परस्पर केल्याची धक्कादायक बाब पहूर येथे उघडकीस आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एक तासाच्या गोंधळानंतर जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार संबंधित महिलेला पळासखेडे, ता. जामनेर रुग्णालयात पुन्हा भरती करण्यात आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचा जीवघेणा खेळ चव्हाट्यावर आला आहे.

कोरोना बाधित महिलेला भरती करून स्वॅब घेतला. या चाचणीचा अहवाल १ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नियमानुसार चौदा दिवस रुग्णालयात महिलेला ठेवणे आवश्यक आहे. पण झाले उलटेच महिलेची तीन दिवसांच्या आत परस्पर सुटी झाली.

आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार>> बाधित महिलेच्या अहवालाला तीन दिवस पूर्ण होत नाही, तोच संबंधित वैद्यकीय अधिका-यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना कल्पना न देता ३ रोजी महिलेच्या मुलाला बोलावून परस्पर डिस्चार्ज केला. जळगाव कोविड रुग्णालयाने बाधित आई व मुलगा यांना खासगी रुग्णवाहिकेने सोडण्याची व्यवस्था केली. तर बाधित महिलेच्या संपर्कातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे. मुलगा पहूर सेंटरवर क्वारंटाईन झाला असून त्याचा स्वॅब घेण्यात आला आहे.

जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार संबंधित महिलेला त्याच रुग्णवाहिकेतून पळासखेडा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अशा भोंगळ कारभाराबाबत नवनियुक्त जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.

रुग्णवाहिका चालकाने रस्त्यातच सोडले >>महिलेचा डिस्चार्ज झाल्याने शेंदुर्णी येथे नातेवाइकांना फोन करुन येत असल्याचे सांगितले. मात्र तीन दिवसांत सुट्टी झाली कशी? या संशयाने शेंदुर्णीत येण्यास संबंधित महिलेच्या नातेवाइकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे ३ रोजी जळगाव कोविड रुग्णालयातून निघालेली रुग्णवाहिका दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास पहूर ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर पाचोरा रस्त्यावर पोहचल्यावर तेथेच सदर महिला व मुलाला सोडून संशयास्पदरित्या निघाली होती.

यादरम्यान पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी क्वारंटाईन सेंटरवरून येत असताना हा प्रकार निदर्शनास आला. संबंधीत वैद्यकीय अधिका-यांनी बाधित महिलेला व रुग्णवाहिकेच्या चालकाला विचारणा केली. तर बाधित महिलेने अधिका-यांना डिस्चार्ज कार्ड दाखविले आणि येथेच बिंग फुटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *