यावल प्रतिनिधी >> शेळगाव बॅरेजसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे योगदान आहे. आगामी काळात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. याच प्रकल्पावरील पुलाचे टेंडर निघाले असून यावलसह रावेरमधील नागरिकांना जळगाव जाण्यासाठी खूप अंतर कमी होणार आहे. याच रस्त्यावर असोदा रेल्वे गेट साठी उड्डाणपुलाची निविदा मंजूर झाली असून आगामी एक-दोन महिन्यात त्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण होऊन कामास आगामी वर्षात सुरुवात होईल, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे शुक्रवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले.
तालुक्यातील बंद पडलेल्या जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणी व अडचणीत असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत, केळी पिकास फळाचा दर्जा मिळावा, तालुक्यात औद्योगिक वसाहत सुरू व्हावी, शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करावे, हिंगोणा येथील मोर धरणाच्या पाटचाऱ्यांचे अपूर्ण अवस्थेतील काम त्वरित पूर्ण व्हावे. मुख्याधिकारी यांची बदली करावी यासह इतर मागण्या त्यांनी केल्या.