धरणाचे पाणी शेतात गेल्याने शेतकऱ्यांना पाण्यात उभे राहून वेचावा लागतोय कापूस

नंदुरबार शहादा शेती

शहादा प्रतिनिधी ::> तालुक्यातील सुसरी धरणाचे पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच पाण्यात बुडाला आहे. तसेच परिसरातील काही शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर कंबरे एवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली आहे.

सुसरी धरणाच्या पाण्यामुळे गोदीपूर ते नवलपूर रस्ता पाण्याखाली गेल्याने गोदीपूर व नवलपूर शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणालगत आहे.

धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणातील पाणी शेतीपर्यंत आले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी लिमजी छगन पाटील यांची गोदीपूर शिवारात शेती आहे. त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती.

धरणाचे पाणी त्यांच्या शेतात साचल्याने कपाशीचे नुकसान झाले आहे. शेतात साचलेल्या पाण्यात उभे राहून त्यांना कपाशीची वेचणी करावी लागते आहे. सुसरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात काही शेतकऱ्यांना शेती गेली आहे. त्यातील काही शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळालेला नाही. शेतात धरणाचे पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले असून, भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.