सात महिन्यांनंतर कापडणे-धुळे मिनिडोअर धावल्या ; मास्क लावल्यानंतरच प्रवाशांना परवानगी

धुळे माझं खान्देश

कापडणे प्रतिनिधी ::> लॉकडाऊनमुळे सुमारे सात महिन्यांपासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनिडोअर बंद होत्या. ही सेवा आता पुन्हा सुरू झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. प्रवाशांना मास्क लावल्यानंतरच मिनिडोअरमध्ये बसण्यास परवानगी दिली जात आहे.

येथील शंभराहून जास्त मिनिडोअर चालक धुळे ते कापडणे अशी प्रवासी वाहतूक करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यानंतर सुमारे सात महिन्यांपासून ही सुविधा बंद होती. परिणामी कापडणे, धनूर, तामसवाडी, हेंकळवाडी, कौठळ येथील ग्रामस्थांना मोठा फटका बसला होता. धुळे शहरात जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर आता सात महिन्यांनी चालक-मालक वाहतूक संघटनेचे अध्यक्ष महेश नेरकर यांच्या प्रयत्नांनी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. श्रीफळ वाढवून वाहतुकीला सुरुवात करण्यात आली.

या वेळी बापू महाराज, छोटू चौधरी,भाऊसाहेब माळी, माऊली माळी, भावडू पाटील, पिंटू बोरसे, सोनू पाटील, पंकज गुरव आदी उपस्थित होते. दरम्यान, कापडणे हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने दिवसभरातून हजारो प्रवासी धुळे शहरासह इतर ठिकाणी प्रवास करतात. आता दिवाळी जवळ येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाल्याने नागरिकांची सोय झाली आहे.