सावद्यात पावणेसात लाखांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

क्राईम फैजपूर रावेर सावदा सिटी न्यूज

सावदा >> येथील सावदा–फैजपूर रोडवर सावदा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी सापळा रचून, ट्रकमधील ६ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा पकडला. ट्रकसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताला अटक केली तर दुसरा पसार झाला.

गुप्त माहितीवरून शहरातील डायमंड तोल काट्यासमोर पोलिसांनी सापळा रचला होता. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास या जागेवर ट्रक (क्र.एम.पी.०९ / के.सी.६८९७) उभा होता. त्यात विक्रीस परवानगी नसलेल्या मिराज तंबाखूचा साठा असल्याने पोलिसांनी कारवाई केली. ट्रक जप्त करत सावदा पोलिस स्टेशनला आणल्यावर तपासणी करण्यात आली. नंतर जळगाव येथील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती कळवण्यात आली.

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी सावदा गाठून तपासणी केली. ट्रकमध्ये ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचा तंबाखूचा साठा होता. तंबाखू आरोग्यास हानिकारक असल्याने राज्यात उत्पादन, निर्मिती, वाहतूक व साठवणुकीला बंदी आहे. याप्रकरणी ट्रकचालक निर्मल मिलन सोलंखी पसार झाला, तर त्याचा साथीदार कमल सुभान मन्सुरे याला अटक केली आहे. दोघे बागफल (ता.बडवा, जि.खरगोन) येथील रहिवासी आहेत.

या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलिसांत कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेश आढायंगे, उमेश पाटील, रिजवन पिंजारी, विशाल खैरनार, तुषार मोरे यांनी कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक आर.डी,पवार, हवालदार संजय चौधरी तपास करत आहेत.

मध्यप्रदेशातून तस्करी
सावदा परिसर हा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा तस्करीचे केंद्र बनले आहे. येथून मध्यप्रदेश सीमा जवळ असल्याने येथून महाराष्ट्राच्या हद्दीत गुटखा तस्करी केली जाते. त्यामुळे कारवाईत सातत्य राखल्यास या प्रकारांना निर्बंध येऊ शकतो.