अध्यात्मप्रधान कर्मयोग मांडणारे ‘संत सावता महाराज’

ब्लॉगर्स कट्टा

@गजानन जगदाळे

आज आषाढ कृष्ण चतुर्दशी. आजच्या दिवशी वारकरी संप्रदायातील थोर संत सावता माळी हे अनंतात विलीन झाले. संत सावता माळी हे निवृत्ती, ज्ञानदेव, नामदेव, गोरा कुंभार यांचे समकालीन संत होते. त्यांचा जन्म १२५० सालचा आहे.

सावता माळी हे माळीकाम करणारे होते, हे त्यांच्या “आम्ही माळीयाची जात । सेत लावू बागाईत ।।” ह्या अभंगातून समजते. त्यांचे वडील परसोबा आणि आईचे नाव नांगिताबाई असे होते. परसोबा हे विठ्ठलभक्त होते. म्हणून त्यांच्या पोटी सावता महाराजांसारख्या विठ्ठलभक्त पुत्राने जन्म घेतला. सावता माळी कधीही पंढरपूरला गेले नाहीत. माझा मळा हाच माझा विठ्ठल असल्याचे त्यांनी मानले. “कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।।” हा त्यांचा अभंग लोकप्रिय आहे.

एकदा सावता माळी यांच्या शेतात भगवंत येऊन लपून बसले. भगवंताला शोधण्यासाठी ज्ञानदेव व नामदेव आले असताना भगवंतांनी त्यांचा शेला डोक्यावर झाकून घेतला आणि सावत्याआड लपून बसले. मात्र तरीही ज्ञानदेव व नामदेवांनी त्यांना हुडकून काढले. याचे कारण विचारले असता सावता म्हणाले की, नाम हे निर्देश करतं आणि ज्ञान हे साक्षात उपलब्धी करून देतं. येथे ज्ञान व नाम हे ज्ञानदेव – नामदेव रुपाने जन्माला आले आहे. म्हणून भगवंत लपून राहिला नाही.

सावता माळी थोर विठ्ठलभक्त असूनही कधी पंढरपूरला गेले नाही म्हणून पंढरीहून पांडूरंगच त्यांना भेटायला आला. संत नामदेवांनी त्यांच्या अभंगात सावता माळ्याबद्दल अत्यंत स्तुतीचे उद्गार काढले आहेत. त्यांचे एकूण ३७ अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या अभंगात शेतातील मोट, नाडा, विहीर दोरी असे शब्द रुपकात्मक पद्धतीने वापरून भक्ती व भगवंताचे वर्णन केले असल्याचे दिसून येते.

सांवता माळी यांनी विठ्ठलाच्या दृष्टिगोचररूपाचे भावस्पर्शी वर्णन पुढील एका अभंगामध्ये केले आहे

‘विठ्ठलाचें रूप अतर्क्य विशाळ। हृदयकमळ मंत्रसिद्घ॥

दिगंबर मूर्ती गोजरी सांवळीं । तोडे पायीं वाळी मनगटीं ॥

कटीवरी हात, हातीं पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलींत ॥

सांवता माळी म्हणे शब्दब्रम्ह साचें । नाम विठ्ठलाचें कलियुगीं ॥’

परब्रह्मभेटीचे वर्णनही सावता माळी यांनी एका अभंगामध्ये केले असून त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलभक्तीचा उत्कट आविष्कार व व्यावसायिक निष्ठा प्रत्ययास येते. आपल्या नित्य व्यवसायातील अनुभवांचे अनेक संदर्भ देऊन त्यांनी अभंगरचना केल्या.
उदा., ‘शांति शेवंती फुलली । प्रेम जाई जुई व्याली ॥’

श्रीज्ञानदेव व नामदेव ह्या थोर संतांचा सहवास त्यांना वारंवार लाभला असावा. संत नामदेवांनी त्यांच्या अद्वैताचा उल्लेख पुढील शब्दांत वर्णिला आहे:

धन्य ते अरण, रत्नाचीच खाण ।
जन्मला निधान सावता तो ।
सांवता सागर, प्रेमाचा आगर ।
घेतला अवतार माळ्या घरी ॥

अरणभेंडी ह्या गावी त्यांच्या पुण्यतिथीचा सोहळा प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. त्यांच्या समाधीकालाविषयीचा पुढील अभंग प्रसिद्घ आहे :

‘बारा शतें सतरा शालिवाहन शक । मन्मथ नामक संवत्सर ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी । आला उदयासी सहस्त्रकर ॥
सांवता पांडुरंगस्वरुपीं मिनला ।
देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥’

संत सावता माळी यांची कविता संख्येच्या दृष्टीने अल्प असली, तरी तिची रचना प्रासादिक आहे. त्यावरून त्यांच्या ठिकाणी पारमार्थिक व काव्यात्मक या दोन भिन्न वृत्ती कशा एकवटल्या होत्या, याची कल्पना येते. त्यांनी आपल्या अभंगांतून अध्यात्मप्रधान कर्मयोग सहजपणे प्रतिपादिला आहे. तत्कालीन भगवद्‌भक्तांत त्यांना मोठा मान होता, याचे चपखल शब्दांत एकनाथांनी वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘एका जनार्दनी सांवता तो धन्य । तयाचे महिमान न कळे काहीं ॥’.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *