कार्तिक शुद्ध एकादशीला संत मुक्ताई मंदिर दर्शनासाठी बंद

Social कट्टा कट्टा मुक्ताईनगर

मुक्ताईनगर >> कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता येत्या गुरुवारी (दि.२६) कार्तिक शुद्ध एकादशीला संत मुक्ताई मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. इतर दिवशी नियमांचे पालन करून दर्शन घेता येईल. मात्र, त्यासाठी मंदिरात प्रवेशापूर्वी तोंडाला मास्क बांधणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे राज्य शासनाने १६ नोव्हेंबर २०२० पासून काही अटींचे पालन करून खुली केली आहेत. त्यामुळे मुक्ताई दर्शनाची आस लागलेले भाविक दररोज वाढत्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.

दरम्यान, तज्ज्ञांच्या दाव्यानुसार जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे येत्या २६ नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक भागवत एकादशी वारीला हजारो भाविक संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत सामाजिक जबाबदारी म्हणून व मंदिरात एकाच दिवशी गर्दी होवू नये यासाठी संत मुक्ताबाई संस्थानने येत्या कार्तिक शुद्ध एकादशीला (दि.२६) संत मुक्ताई मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वारकरी भाविकांनी कार्तिक एकादशीला दर्शनासाठी येऊ नये. तसेच इतर दिवशी मंदिर उघडे राहील. त्या दिवशी भाविकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मास्क घालून दर्शन घेता येईल, असे मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष यांनी कळवले आहे.