साक्री ::> तालुक्यातील कढरे शिवारातील जंगल भागात एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने संगीताबाई होलार या महिलेचा साडीने गळफास लावून तिचा खून केल्याची घटना घडली.
याबाबत रवी होलार याने तक्रार दिली असून, निजामपूर पोलिस ठाण्यात अज्ञात मोटारसायकलस्वार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलिस पथकाने दाखल होऊन परिसराची पाहणी केली.
धुळे तालुक्यातील नंदाणे या गावाचे रहिवासी असलेल्या संगीताबाई सुखदेव होलार (वय ४०) या आपल्या १३ वर्षाच्या रवी सुखदेव होलार या मुलासह शुक्रवारी (दि.१८) दुपारी चार वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी चालत होते.
यावेळी अंगात शेंदरी रंगाचा शर्ट घातलेल्या एका काळासावळा रंगाच्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने त्यांना मोटारसायकलवर सोडून देण्याचे सांगून मोटारसायकलवर बसवले.
यानंतर बैलगाडीवरील खताची गोणी टाकून देऊ मग लगेच तुम्हाला सोडून देईन, असे सांगून मोटारसायकल चालक हा त्या दोघांना कढरे गावाच्या शिवारालगत असलेल्या जंगल भागात घेऊन गेला.
या ठिकाणी मोटारसायकल थांबवून संगीताबाई यांच्या अंगावरील साडीच्या पदराने त्यांना गळफास लावून जीवे ठार मारून खून केला.
यानंतर मृत संगीताबाई हिच्या तेरा वर्षाच्या रवी या मुलास देखील या आरोपीने अंगातील सदऱ्याच्या साह्याने गळफास लावून त्याला झाडाझुडपात फेकून दिले; परंतु सुदैवाने या घटनेत रवी होलार याचा जीव वाचला.
या घटनेविषयी निजामपूर पोलिस ठाण्यात रवी सुखदेव होलार याने फिर्याद दिली असून, अज्ञात मोटारसायकल चालक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.