प्रतिनिधी धुळे ::> साक्री तालुक्यातील जैताणे गावातील तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.जैताणे येथील विवेक हिरामण वाघ (वय २५) या तरुणाने राहत्या घरी छतास साडीने गळफास घेतला.
दुपारी एक वाजेच्या सुमारास त्याचे वडील घरात आले असताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्याला अत्यवस्थ परिस्थितीत जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; परंतु उपचार सुरू करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. डॉ.अमोल पवार यांनी तपासणी करून विवेकला मृत घोषित केले.
या प्रकरणी दिनेश सुरेश वाघ यांनी दिलेल्या माहितीवरून निजामपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विवेकच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत काही जणांकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.