साकळीत दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला ! गावात चिंतेचे वातावरण!

यावल

●प्रशासनाची धावाधाव
● एकूण रुग्ण संख्या झाली दोन


साकळी ता.यावल(वार्ताहर)- येथील अक्सा नगर भागात दि.२४ रोजी एक ४५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने गावात मोठी खळबळ निर्माण झालेली असून धास्ती वाढली आहे. गावातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या दोन झालेली असून सदर रुग्णही व्यापारी वर्गातील असल्यामुळे त्यांचा गावातील संपर्क पाहता गावाची मोठी चिंता वाढलेली आहे.तसेच दुसरा सापडलेला रुग्ण हा पहिल्या रुग्णाचाच भाऊ आहे.तसेच या रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना क्वांरंटाईन करण्यात आलेले असून त्यांना फैजपूर येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी या रुग्णास त्रास जाणवू लागल्याने ते जळगाव येथील शासकीय कोविड वैद्यकीय रुग्णालयात दाखल आहे. आरोग्य प्रशासनाकडून या भागातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.


दरम्यान दि.२३ रोजी वरिष्ठ कार्यालयाकडून माहिती मिळाल्यामुळे सदर या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्या घराचा परिसर प्रतिबंधित करणे, कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाईन करणे तसेच त्या परिसरातील रहिवाशांची तपासणी करणे अशा संदर्भाची कारवाई आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनाकडून युद्धपातळीवर करण्यात आली होती. तथापि रुग्णाचा कोरोना अहवाल बाबत साशंकता निर्माण झाल्याने संबंधित प्रशासनाची चांगलीच ‘ दमछाक ‘ झाली तर त्या रुग्णाच्या कुटुंबासही चांगलाच मनस्ताप झाला. त्यानंतर दि.२४ रोजी सकाळच्या दरम्यान त्या भागात लावण्यात आलेले बॅरिकेट्सही काढण्यात आले होते. परंतु याच दिवशी दुपारी उशिरापर्यंत ‘ त्या ‘रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा गावातील कोरोना प्रतिबंध प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. सदर रुग्णाच्या व्यवसायानिमित्त त्यांच्याशी अनेकांचा संपर्क येत असल्याने या संपर्कीत सर्वांची माहिती गोळा करून त्यांची तपासणी करणे अतिशय महत्त्वाचे असून हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.


त्याचप्रमाणे दि.२४ रोजी फैजपूर येथील प्रांतअधिकारी डॉ. अजित थोरबोले, यावलचे तहसीलदार जितेन्‍द्र कुंवर,प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा पाटील या अधिकार्‍यांच्या पथकाने गावातील ‘कंटेंनमेंट झोन ‘ ची पाहणी केली व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत काही महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी गावातील आरोग्य महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *