साकळी गाव ते साकळी बस स्टन्ड रोड खड्डेमय झाल्याने ग्रामस्थांचा संताप !

आंदोलन निषेध यावल साकळी

साकळी प्रतिनिधी ::> साकळी गाव ते साकळी बस स्टन्ड रोड हा खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर आता पायी चालणे व दुचाकी चालवणे कठीण झाले आहे. महात्मा फुले चौक ते बस स्टन्ड रोडवर वाहनधारकांना उंट सवारीची अनुभुती मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती ने केल्याने खड्ड्यांची संख्या वाढत आहे. तसेच खड्ड्यांची संख्या वाढल्याने व गटारी तुडुंब भरल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. या रस्त्यावरून पावसाळ्यात नागरिकांचे अतोनात हाल झाले असून रस्त्यात गुडघ्याच्यावर पाणी साचते तरीही याकडे संबंधित बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजुवण्याची व साईड पट्ट्या दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झुडपे वाढल्याने अपघाताला आमंत्रण मिळू शकते. तसेच गावाच्या सुरुवातीलाच तुडुंब गटारी भरल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. पायी जाणाऱ्या किंवा दुचाकी चालकांना याचा नेहमी त्रास होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पावसाळ्यात वाहून आलेला कचरा हा गटारीत अडकल्याने पाणी पुढे वाहने थांबले असून या पाण्याचा दुर्गंध परिसरात दूरपर्यंत येतो. अशाने डेंगू या आजाराला चालना मिळत आहे. मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात वाहून आलेला कचरा व सांडपाणी या समस्यांचे निराकारण करावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.