मास्क न लावणाऱ्या दोन पोलिसांना पोलीस निरीक्षकांकडून दंड

क्राईम रावेर

प्रतिनिधी रावेर >> कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असताना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलिस कारवाई करत आहेत. मात्र, दुसऱ्यांना कायदा, नियमांची शिकवण देणाऱ्या पोलिसांनीच मास्क न वापरण्याची केलेली चूक त्यांच्यावर कारवाईसाठी पुरेशी ठरली.

रावेर पोलिस ठाण्यात विना मास्कने फिरताना आढळल्याने दोन कर्मचाऱ्यांवर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दंडात्मक केली. तर कायदा सर्वांसाठी समान हेच निरीक्षक वाकोडे यांनी या करवाईतून दाखवून दिले.

रावेर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सचिन गायकवाड आणि सुकेश तडवी हे दोघे पोलिस ठाण्यात विना मास्क फिरत होते. हा प्रकार निरीक्षक वाकोडे यांना आढळून आला.

यानंतर फिरत्या तपासणी पथकाचे प्रमुख कर्मचारी भागवत धांडे यांनी वाकोडे यांच्या सूचनेवरून या दोघा कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला.

पोलिसांनी पोलिसांवर केलेल्या कारवाईची तालुक्यात शनिवारी दिवसभर चर्चा होती. तसेच दिवसभर सर्वांनी मास्क वापरले.