रावेरातील २८ वर्षीय युवकाची नैराश्यातून आतेभाऊला कॉल करून तापी नदीत उडी घेत केली आत्महत्या

आत्महत्या क्राईम निषेध रावेर

रावेर प्रतिनिधी >> रावेरातील एका २८ वर्षीय युवकाने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली असून याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील श्री हनुमान वाड्यात राहणारे रहिवासी व एका आरोग्य विमा कंपनीतच नोकरी करत असलेल्या २८ वर्षीय अविवाहित युवकाने आतेभावाला कॉलवरून कळवत निंभोरासीम ते नांदुपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावरून तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना ३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. कोरोनाच्या लॉकडाउनपुर्वी जळगावला एका बँकेत असलेली सेवा संपुष्टात आल्यापासून बेरोजगारीच्या मानसिक तणावात तो होता. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शहरातील युवावर्गात शोककळा पसरली आहे.

याबाबत रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हनुमान वाड्यातील रहिवासी असलेला दिपक प्रकाश माळी (वय २८) हा बीकॉम पदवीधर युवक एका आरोग्य विमा कंपनीत सेवारत होता. आपले दैनंदिन कामकाज आटोपून गुरूवारी सायंकाळी घरी येवून बाहेर गेला असता त्याने वडीलांना भ्रमणध्वनीवरून फोन करत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान, गुरुवारी रात्री उशिरा त्याने त्याचा आतेभाऊ मनोज महाजन यांना भ्रमणध्वनीवरून तापी नदीच्या पुलावर मोटारसायकल, बॅग व मोबाईल ठेवला असून तापी नदी पात्रात उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे कळवले व लगेच उडी मारली. रात्री उशिरापर्यंत धुरखेडा येथील मच्छीमारी व्यावसायिकांनी शोध मोहीम राबवली. मात्र ती विफल ठरली. शुक्रवारी सकाळी धुरखेडा येथील ज्ञानेश्वर बेलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा मृतदेह तापीनदीच्या खोल पात्रातून बाहेर काढला.

रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. एन. डी. महाजन यांनी शवविच्छेदन केले. शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पश्चात आई वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अर्जून सोनवणे पुढील तपास करीत आहेत.