रावेरला वाळू वाहतूक प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

क्राईम रावेर

प्रतिनिधी रावेर >> महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने सोमवारी पकडली. त्यापैकी एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर दुसरे वाहन वाळू वाहतूक करणाऱ्याने महसूल कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत पळवून नेले. याप्रकरणी तलाठी रवी शिंगणे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

अजंदा गावाजवळ सोमवारी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले. हे ट्रॅक्टर जप्त करत दंडाची नोटीस वाहन मालकाला देण्यात आली. तर दुपारी पातोंडी गावाजवळ शाळा व मंदिराच्या ठिकाणी अवैध वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर दिसले. त्यांनी चालकाला थांबवून परवाना मागितला.

मात्र, ट्रॅक्टर मागे मोटारसायकलीवर असलेल्या सुनील पुंडलिक सावळे याने शिंगणे यांना शिवीगाळ करत ट्रॅक्टर पळवून नेत वाळूची चोरी केली. अशी तक्रार रावेर पोलिस ठाण्यात दिल्यावरून सुनील सावळे व चालक सुनील गोविंदा हडपे (दोन्ही रा.नेहेता, ता.रावेर) यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व अवैध वाळू वाहतूक, चोरीचा गुन्हा दाखल झाला.