दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यावर फोडली बिअरची बाटली

Jalgaon क्राईम चोरी, लंपास जळगाव जळगाव जिल्हा पाेलिस

जळगाव प्रतिनिधी >> हळदीच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या चार मद्यधुंद तरुणांनी दुसऱ्या एका तरुणाकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने चौघांची त्याला मारहाण केली. डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. यानंतर त्याच्या गळ्यातील ३० हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन हिसकावून घेतली. दोन जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता पिंप्राळ्यातील गणपतीनगर येथे ही घटना घडली.

राकेश दिलीप कुंभार (वय २५, रा. पिंप्राळा, गणपतीनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. दोन जानेवारी रोजी राकेशच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबीयांकडे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. तेथे रात्री नाचण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी राकेश ओट्यावर बसलेला होता. दरम्यान, या वेळी राकेश मिलिंद जाधव (वय २५, रा. माळी चौक), गम्प्या, वण्या (पूर्ण नाव माहित नाही, दोघे रा. बौद्धवाडा) व योगेश पाटील चायनिजवाला (रा. गणपतीनगर, पिंप्राळा) हे चौघे तेथे हातात बिअरची बाटली घेऊन नाचत होते.

दरम्यान, चौघांनी राकेश कुंभारकडे जाऊन दारू पिण्यासाठी पैसे मागितले. राकेशने पैसे देण्यास नकार देताच चौघांना राग आला. यातच त्यांनी राकेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या खिशातील ५०० रुपये काढून घेतले. राकेश जाधव याने हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात फोडली. यामुळे राकेशला ग्लानी येऊन तो बेशुद्ध पडला.

या वेळी चौघांनी त्याला आणखी मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील ३० हजार ५०० रुपयांची सोन्याची चेन हिसकावून घेत पळ काढला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी राकेश याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध मारहाण, जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.