लेफ्टनंट कर्नलपदी निवड झालेल्या किनगावच्या राहुल पाटीलचे जल्लोषात स्वागत

Social कट्टा कट्टा किनगाव पाेलिस यावल

किनगाव प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील किनगाव येथील राहुल अरुण पाटील या तरुणाची अधिकारी म्हणून सैन्य दलातील गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर निवड झाली असून त्याचे बुधवारी गावात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. तालुक्यातून प्रथमच सैन्य दलातील अशा मोठ्या पदावर काम करण्याची संधी कुणाला मिळाली म्हणून गावात अपूर्व उत्साह दिसून आला.

राहुल पाटील हा तरुण सैन्य दलात कार्यरत आहे. तो मध्यमवर्गीय परिवारातील असून लहानपणापासूनच अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न होते. त्या मुळे सेवेत असताना त्याने सैन्यदलातील विविध परीक्षांसह प्रशिक्षण पूर्ण केले. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांच्या खांद्यावर स्टार लावत त्यास गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर नियुक्ती देण्यात आली. त्या नंतर बुधवारी राहुल पाटील यांचे प्रथमच किनगावात आगमन झाले. तेव्हा गावात सरपंच भूषण पाटील, बबलू कोळी, गॉड स्मित ट्रस्टचे मनिष पाटील यांच्यासह नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

बसस्थानकापासूनच थेट गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात फटाक्यांची आतषबाजी, फुले उधळत तसेच ‘भारतमाता की जय’ अशा जयघोषात राहुल पाटील याचे स्वागत करण्यात आले. मुलाचे गावात झालेले हे भव्य स्वागत पाहून राहुलची आई रंजना पाटील व वडील अरुण मुरलीधर पाटील हे देखील अत्यंत भारावून गेले होते. संपूर्ण गावात या प्रसंगामुळे संपूर्ण देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

नागालँडला पहिली पोस्टिंग
गोरखा रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल पदावर निवडीनंतर राहुल पाटील यास प्रथम पोस्टिंग नागालँड येथे देण्यात आली आहे. राहुलचे आजोबा मुरलीधर पाटील हेही सैन्य दलात सैनिक होते. त्यांचा वारसा आपण पुढे नेत असल्याचा एक वेगळा आनंद आपणास असून देशसेवेची संधी लाभल्याने आपण भाग्यवान आहोत, असे राहुल याने सांगितले.