तिच्या जिद्दीला सलाम आणि माणसाच्या माणुसकीवर थू….

ब्लॉगर्स कट्टा

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट

मयूर गव्हाणे औरंगाबाद >> आपल्या पोटात आपलं बाळ आहे, आपल्याला उपाशी राहून चालणार नाही असा विचार करत ती अन्नाच्या शोधात निघाली. भटकता भटकता जंगलाच्या बाहेर आली. बाहेर तिला एक मानवी वस्ती दिसली. त्या वस्तीच्या ठिकाणी आपल्याला हमखास काहीतरी खायला भेटेल या आशेने ती गावात आली.

गावातील लोकांनी तिला फिरताना बघितले. ते तिच्या जवळ गेले. तिच्यापुढे अननस धरले. ही माणसं किती दयाळू असतात असा विचार करुन तिनेही अननस सोंडेत घेतले. सोंडेतील अननस तोंडात टाकत असतानाच अचानक स्फोट झाला. तिची सोंड आणि तोंड रक्तबंबाळ झालं.

अचानक झालेल्या या स्फोटानं तिचं तोंड भाजले. तशा अवस्थेतही लोकांनी आपल्या बाळासाठी आपल्याला खायला दिले याची तिने जाण ठेवली.

आपलंच काहीतरी चुकलं असणार असा विचार करुन कुणालाही कसलेही नुकसान न करता ती तिथून निघाली. आपल्याला खाल्लं पाहिजे, आपल्या पोटात बाळ आहे एवढंच तिला माहीत होतं. अन्नाचा शोध संपत नव्हता आणि वेदनांचा डोंब थांबत नव्हता.

फिरता फिरता ती वेल्लीयार नदीजवळ आली. स्फोटामुळे जळालेली सोंड आणि तोंड नदीच्या पाण्यात बुडवून ती उभी राहिली. थोडासा आराम मिळाला. बरं वाटलं जीवाला ! काही काळ भुकेचा विसर पडला.

मनात बाळाचा विचार करत ती तशीच नदीत उभी होती. विचार करता करता तिच्या लक्षात आलं, आपण अननस तोंडात घेतल्यावरच हा स्फोट झाला. म्हणजे ज्यांनी आपल्याला अननस खायला दिले, त्यांनीच अननसातच काहीतरी घातले नव्हते ना ? मनात शंका दाटून आली. ज्यांना मी दयाळू समजत होते, तीच माणसं माझ्या बाळाच्या जीवावर उठली. ही माणसं आम्हाला सुखाने का जगू देत नाहीत ?

मनात प्रश्नांचे काहूर माजले असताना काही माणसं नदीजवळ आली. तिला नदीतून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करु लागली. पण माणसं दिसली की तिचा पारा चढला. मी उपाशी राहून मरेन, पण या माणसांना माझ्या बाळाजवळ येऊन देणार नाही हा निश्चयच तिने केलता. शेवटपर्यंत तिने कुणालाही जवळ येऊन दिले नाही. शेवटी ती भुकेनेच मेली. तिच्यासोबत तिचे बाळही मेले.

तिच्या जिद्दीला सलाम आणि माणसाच्या माणुसकीवर थू….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *