लाज वाटायला हवी…

Politicalकट्टा ब्लॉगर्स कट्टा

जळगाव शहर आणि जिल्हा कोरोनाच्या संसर्गामुळे वाढत्या रुग्णसंख्येत देशभरात कुख्यात झाले आहे. एकूण ४ हजार रुग्णांचा आकडा पार होण्याच्या मार्गावर असून जर संसर्गाची साखळी मोडली नाही तर अवघ्या महिनाभरात रुग्ण संख्या सहा हजारवर पोहचलेली असेल. जिल्हा प्रशासन वाढील २ हजार खाटांच्या तयारीला लागले आहे. संसर्गाची साखळी मोडण्याचा एक सक्तीचा प्रयत्न म्हणून दि. ७ ते १३ असा ७ दिवसांचा लॉकडाऊन जळगाव शहरासह अमळनेर व भुसावळ शहरात सुरू आहे.

एकीकडे नागरिकांना घरात थांबवायला जिल्हा प्रशासन, पोलीस व मनपा प्रशासन रस्त्यावर उतरलेले असताना भारतीय जनता पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री व विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जळगावात दौरा करुन गेले. अर्थात, यापूर्वी चौथ्या लॉकडाऊन काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेही जळगावचा दौरा करुन गेले. डॉ. टोपे यांच्या दौऱ्यात मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजला होता. फडणवीस सांच्या दौऱ्यात काही सुधारेल अशी अपेक्षा होती. पण कोरोना संसर्ग काळात जनतेपासून लांब निर्लज्ज पुढारी फडणवीसांच्या भोवती निर्लज्जपणे गर्दी करताना दिसले. नाही म्हणायला तोंडावर मास्क होते पण सोशल डिस्टन्सिंगच फज्जा उडाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयातून खाली उतरताना फडणवीस सोबत किमान १०० वर प्रतिनिधी होते. हॉटेल सिल्वर पैलेस बाहेर किमान ५० वर गाड्यांची पार्किंग होती. नेत्यांनी सर्वच नियम धाब्यावर बसविले.

वास्तविक लॉकडाऊनच्या काळात फडणवीस यांच्यासारख्या समंजस व हुशार नेत्याने जळगावात येणे टाळायला हवे होते. त्यांच्याभोवती कोंडाळे करणाऱ्यांना लाज वाटायला हवी होती. कारण सरकारने मृत्यूसाठी केवळ २० आणि विवाहसाठी फक्त ५० जणांना गर्दीची परवानगी दिली आहे. ती सुद्धा सुरक्षेचे नियम पाळून पण फडणवीस यांचा दौरा असा कोणत्या नियमात होता की तेथे १०० वर लोक गोळा झाले ? डॉ. टोपेंच्या दौऱ्यात जे घडले तेच फडणवीस यांच्या दौऱ्यात घडले. नेते आणि त्यांचे समर्थक असेच काळे-गोरे.

जळगाव शहरावर जिल्हा प्रशासनाने लादलेला लॉकडाऊन फसवा आहे. काही भागात लोक बाहेर निघत नाहीत पण बहुतांश भागात लोक मजेत फिरत आहेत. ना पोलीस अडवताना दिसतात ना सक्ती आहे. महामार्ग तर नेहमीप्रमाणे ओसंडून वाहतो, अशा प्रकारे ‘गांडू’ यंत्रणेच्या भरवशावर कोरोना थोडेच नियंत्रणात येणार आहे. हे जळगावकर आहेत. आई-बाप म्हणाले घरात बस तरी हे आजूबाजूला ढुंकायला जातात. इकडचा-तिकडाचा वास घेतल्याशिवाय जळगावकर घरात बसत नाही. कोणता भाग कसा सुरू आहे, हे पाहायला जायचे असेल तर हा जळगावकर काहीही थापा मारू शकतो. अशा लोकांना ढुंगणावर फटकेच हवेत. चार मारून एक मोजायला हवा. अर्थात, जेथे निर्लज्ज पुढारी कोरोना संसर्ग प्रतिबंधाचे नियम धाब्यावर बसवतात तेथे जळगावकर असा पांचट आणि गेल्या वागेल हे नक्की. पुढारी निर्लज्ज तर आहेच पण जळगावकरही बीन लाजेचे आहेत.

कोरोना घाल बाबा धुमाकूळ, तुला जसा घालायचा तसा ….

दिलीप तिवारी, जळगाव

1 thought on “लाज वाटायला हवी…

  1. सर,अतिशय समर्पक असा लेख लिहिण्यासाठी आपले अभिनंदन.
    आणि हो राजकारणी निर्लज्ज होतेच आणि जळगावकर त्याहून अधिक निर्लज्ज आहेत ही काळ्या दगडावरची रेष.
    आमचं ब्रीद वाक्य मरीन पण गाव भर फिरिन
    🤐🤫🤫🤐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *