सत्ताधारी खडसे समर्थकांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था!

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास खा.रक्षा खडसेंसह सत्ताधारी समर्थकांना पक्षांतर करता येणार नाही

रिड जळगाव टीम ::> खासदार रक्षा खडसेंसह इतर खडसे समर्थक आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य आणि सहकारी संस्थांमधील पदाधिकारी आपापल्या पदावर कायम राहणार असून ते संबधित संस्थेची पुढील निवडणूक येईपर्यंत भाजप मध्येच असतील. खडसेंच्या संभाव्य प्रवेशावरून निर्माण झालेल्या गोंधळानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना हा निराेप देण्यात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ खडसे यांचे समर्थक जिल्हाभरात आहेत.

नाथाभाऊंनी पक्षांतर केले तर आपल्यालाही करावे लागेल आणि अशावेळी सत्तेचे पदही सोडावे लागेल का, अशा विवंचनेत काही पदाधिकारी होते. त्यामुळे ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था होती. त्यांना दिलासा देणारा संदेश नुकताच पाठविण्यात आला आहे. त्यानुसार ज्यांच्याकडे सत्तेचे कोणतेही पद नाही, असेच खडसे समर्थक त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील. सत्तेच्या त्या पदाची मुदत संपेल त्यानंतर संबंधित पदाधिकारी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करेल, असेही ठरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

भाजपचे जेष्ठनेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले तर त्यांच्यासोबत कोण कोण पक्षांतर करतील, असा प्रश्न भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये औत्सुक्याचा आहे. मात्र, खडसे यांचे जे समर्थक सध्या सत्तेच्या पदांवर आहेत त्यांना त्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत पक्षांतर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादीत जाण्याच्या अटी-शर्तीबाबत अजुनही निकटवर्तीयांना देखील काेणत्याही बाबी सांगितलेल्या नाहीत. केवळ प्रवेश झाल्यास काेण येवू शकेल, काेण पुढच्या टप्प्यात पक्षात येईल, काेणाला काेठे संधी शक्य आहे याबाबतचे मंथन खडसेंच्या निवासस्थानी सुरू आहे, असे सांगण्यात येते आहे.

सध्या एकनाथ खडसे काेणत्याही पदावर नाहीत. त्यांच्या कन्या अॅड. राेहिणी खडसे या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा असून बँकेची पाच वर्षाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे त्या देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातील, असे संकेत आहेत. मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजपचे सर्व नगरसेवक एकाच वेळी पक्षांतर करतील आणि त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही, असेही सांगण्यात येते आहे. अन्य काेणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी तुर्त राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत.

Source ; Divya Marathi