पारोळ्यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा; मुख्य महामार्गावर प्रचंड गर्दी

निषेध पारोळा

पारोळा प्रतिनिधी >> कोरोनाच्या वाढत्या रुग्णामुळे आठवडे बाजार बंद केलेला असतानाही रविवारी येथील राष्ट्रीय महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतकरी व व्यापारी वर्गाने प्रचंड गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

रविवार हा तालुक्याचा आठवडे बाजाराचा दिवस असतो. परंतु कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने आठवडे बाजार बंदची घोषणा केली होती. त्या मुळे भाजीपाल्यासह इतर मालाचे लिलाव झाले नाही.

परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर परिसरात गुरे खरेदी-विक्रीसाठी व्यापारी व शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. विशेष म्हणजे बाजार समिती बंद असताना गर्दी झाली.

यात बहुतांश जणांनी मास्कही लावलेले नव्हते. रविवारी लग्नाचीही मोठी तिथी असल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्पच होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली.