पहूर प्रतिनिधी ::> येथील व्यापारी रवींद्र धोंडू पाटील (रा.जांभूळ, ता.जामनेर) हे घरी जात असताना रविवारी रात्री मोटरसायकल आडवी लावून व डोळ्यात मिरची पूड फेकून एक हजार रुपये लुटले व २० हजार रुपये असलेली बॅग गहाळ झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पहूर कसबे येथील तिघांविरुद्ध दारोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.
पहूर येथील कृषी केंद्र व्यापारी रवींद्र धोंडू पाटील हे जांभूळ येथील रहिवासी आहेत. रात्री ९च्या सुमारास ते आपल्या गावी मोटारसायकलने (क्र. एमएच.१९-सीई.६७६१) सहकारी अविनाश संजय पवार यांच्यासोबत गावी जात होते.
पिंपळगाव बुद्रूकपर्यंत दुचाकीवरून कोणीतरी पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे पाटील यांनी आपल्या दुचाकीची गती कमी केली. यानंतर पिंपळगाव कमानी तांड्याच्या दोन किमी पुढे तिघांनी दुचाकी आडवी लावून रवींद्र पाटील व अविनाश पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली.
यानंतर पाटील यांच्या खिशातील एक हजार रुपये व हातातील बॅग हिसकावून घेतली. यानंतर तिघांनी पलायन केले. याबाबत पाटील यांनी पिंपळगाव बुद्रूक येथील नातेवाइकांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थ मदतीला धावले.
या घटनेच्या काही वेळाने काळ्या रंगाच्या पल्सर वर तिघे रस्त्याने जाताना दिसले. ग्रामस्थांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. त्यात तिघांनीच रस्ता लूट केल्याचे समोर येताच जमावाने त्यांना चोप दिला.
पहूर पोलिसांच्या ताब्यात दिले. हे तिघे पहूर कसबे येथील रहिवासी आहेत. रवींद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून अनिकेत कडूबा चौथे, गोपाल सुखदेव भिवसने व चेतन प्रकाश जाधव यांच्याविरुद्ध पहूरला दारोड्याचा गुन्हा दाखल झाला. या तिघांना जामनेर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.