भाजीपाला ओट्यांच्या लिलावास व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ

पाचोरा सिटी न्यूज

पाचोरा ::> पाचोरा पालिकेने तयार केलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांना व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. मात्र, तळमजल्यावरील भाजीपाला ओट्यांचे सरकारी भाव अधिक असल्याने व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच आता या ओट्यांचा लिलाव होईल.

पाचोरा नगर परिषदेने नागरिकांना सर्व व्यवहार एकाच ठिकाणी करण्याच्या उद्देशाने भाजीपाला मार्केटसह विविध व्यवसायांसाठी २९४ गाळ्यांची निर्मिती केली आहे.

या व्यापारी संकुलास माजी मंत्री स्वर्गीय के. एम. पाटील यांचे नाव दिले आहे. या गाळ्यांचा ४ ते ६ नोव्हेंबरपर्यंत खुला लिलाव करण्यात आला.

प्रांत राजेंद्र कचरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इन कॅमेरा खुल्या पद्धतीने लिलाव करण्यात आला.

याप्रसंगी आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्दिकर, संजय कुमावत, गटनेते संजय वाघ, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले व नगरसेवक उपस्थित होते.

यात चार ते पाच तारखेला पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील १५२ गाळ्यांच्या लिलावाप्रसंगी व्यावसायिकांनी मोठी स्पर्धा निर्माण केल्याने ५ ते ६ लाख रुपये सरकारी बोली असलेले गाळे २० ते ३० लाखांपर्यंत विकले गेले.

मात्र, ६ नोव्हेंबरला तळमजल्यावरील १४२ भाजीपाला ओट्यांचा लिलाव होता. मात्र, हे ओटे व्यापाऱ्यांना परवडत नसल्याने लिलावाप्रसंगी केवळ १२ व्यापारी उपस्थित होते. यामुळे या लिलावास स्थगिती देण्यात आली.