यावल शहरातील राज्य मार्गावर मोकाट गुरांचा ठिय्या, वाहतुकीस अडथळा

निषेध यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी ::> शहरात मोकाट गुरांचा त्रास पुन्हा वाढला आहे. शहरातील अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरांच्या संचारामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. वाहनधारकांसाठी मोकाट गुरे डोकेदुखी ठरली असून पालिकेने या संदर्भात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांसह वाहन धारकांकडून केली जात आहे.

शहरातील मेन रोड तसेच शहरातून जाणाऱ्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरांचा वावर असतो. थेट रस्त्याच्या मध्यभागी ही गुरे ठाण मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो.

काही मोकाट गुरे तर बस स्टँडपासून ते बुरूज चौकापर्यंतच्या रस्त्यावर सतत ठाण मांडून असतात. परिणामी वाहनधारकांना येथून मार्ग शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर अनेक मोकाट गुरांमुळे किरकोळ अपघात आता नित्याचे झाले आहेत. यामुळे नगर पालिकेने या मोकाट गुरांवर तसेच त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करावी. तेव्हाच या समस्येला आळा बसू शकेल, अशी मागणी वाहन धारक नागरिकांकडून केली जात आहे.