जळगाव प्रतिनिधी ::> तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत आता मोबाइलवरुन अवैध धंदे सुरू केले आहेत. साेशल मीडियावरून सट्टा घेणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. एमआयडीसी पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील, जितेंद्र विसपुते, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुकेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वकार कय्युम खान (रा.पंचशीलनगर, तांबापुरा) व वसीम खान अफसर खान (रा. शिवाजीनगर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तांबापुरा येथे सोशल मीडियावरून कल्याण व मिलन मटका नावाच्या सट्ट्याचे आकडे लावले जात असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे तपास केला असता मोबाइलच्या माध्यमातून वसीम खान, खान साहेब, दानिश भाई, एमडी सलीम टेलर, अशपाक मुल्ला, साहील भतीजा या लोकांनी सट्टा लावल्याचे आढळून आले.
विकार याच्याकडून ७ हजार रुपये किमतीचा मोबाइल व ९५० रुपये रोख पोलिसांनी जप्त केले आहेत. वसीम खान हा शिरसोली नाका परिसरात मोबाइलवरुन सट्टा घेत असल्याचे आढळून आले. त्याच्या मोबाइलमध्ये सलीम भाई, मस्तान, इरफान शेख, पहिलवान या नावाच्या लोकांनी सट्टा लावला होता. वसीम याच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि १ हजार २५० रुपये रोख पोलिसांनी जप्त केले आहेत.