लोकांची बेफिकीरीच जिल्ह्यात कोरोनाला पोषक

Politicalकट्टा जळगाव

पोलिसांची धडपडपणाला लावूनही प्रशासन हतबल

जळगाव : राज्यात कोरोनामुळे 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. तेव्हापासून साधारण 2 मे पर्यंत जळगाव जिल्हा एक प्रकारे स्वत:ला बिनधास्त समजत होता. मात्र नंतरच्या काळात वाढलेल्या व वाढतच असलेल्या रूग्णसंख्येने हा भ्रम निकालात काढला. त्यामुळे आता लोकांची बेफिकीरीच जिल्ह्यात कोरोनाला पोषक असल्याचे पश्चातापादग्ध चिंतन करण्याची वेळ आली आहे.

पोलिसांची धडपड पणाला लावूनही प्रशासन हतबल ठरत असल्याचे गेल्या चार दिवसांतले चित्र आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या पहिल्या आठवड्यात या मुद्द्यावर कुणीच गंभीर नव्हते हे वास्तव आहे. अगदी मुंबई-पुण्याच्या बातम्या चवीने चघळल्या जात होत्या. विदेशातून आलेल्या लोकांमुळे त्या शहरांमध्ये हा आजार वाढणारच ; त्यात आश्चर्य काय?, असा तर्क लावला जात होता.

राज्याच्या प्रशासनाचे लक्ष मुंबई-पुण्यावरच असेल असा समज सामान्य लोकांनी करून घेतलेला होता त्यामुळे लोक बिनधास्त किरकोळ कामांसाठीही फिरत होते. त्यातूनच पोलिंसांना चुकवून शहरातून लोक पाचोरा, अमळनेर, भुसावळ भागात जाऊन आले असतील तर ते आता सगळ्यांना महागात पडेल अशी भिती व्यक्त होऊ लागलेली आहे.

पाचोरा, अमळनेर, भुसावळ या तालुक्यांना फटका बसण्याचे एक कारण ज्या काळात रेल्वे सुरू होत्या त्या काळात नकळत झालेले व लक्षात न आलेले संक्रमण ; हे ही सांगितले जात असले तरी खरे कारण लॉकडाऊनच्या पहिल्या 15 ते 20 दिवसांत सामान्यांनी दाखवलेले अक्षम्य दुर्लक्ष कुणालाही नाकारता येणार नाही.

देशभरासह राज्यात जे चित्र दिसत गेले ते पाहून आता खरी आपल्या जिल्ह्याची पाचावर धारण बसली आहे. तसेही सार्वजनिक आरोग्याबाबत आपल्याकडे सगळ्यांचीच मानसिकता संकुचित वृत्तीमुळे फार काही समधानकारक नाही या बाबीचा विचार करून लोकांना आता कसे हाताळावे याचा स्वतंत्रपणे विचार प्रशासनाच्या पातळीवर करावा लागणार आहे.

हा आजार फोफावण्याची मुळे संकुचित वृत्तीमुळे आलेल्या बिनधास्त वर्तणुकीत असल्याचे आता आरोग्य क्षेत्रातील जाणकारही मान्य करीत आहेत. या आजाराचा मुकाबला करर्‍यासाठी सगळीकडे पोलिस, आरोग्यसेवा व महसूल खाते वेगवेगळ्या आघाड्यांवर लढते आहे. त्यात सामान्य माणसांना या आजाराचे गांभीर्य न कळणे ; यामुळे पोलिस व महसूल खात्याचा ताण वाढलेला आहे.

शेजारचे बुलडाणा, औरंगाबाद व धुळे या जिल्ह्यांमध्येही फारसे आशादायक चित्र नसल्याने खूप मोठ्या आव्हानातून आता मार्ग काढावा लागणार आहे. फक्त दूध, औेषधी, बाजारातील गरजेच्या वस्तू आणायला जाण्यासाठी नियमातून दिलेली सूट म्हणजे या कामासाठी बाहेर पडणारांना या आजाराचा त्रास होणार नाही, असा या सवलतीचा अर्थ होत नाही. कुणाचाही, कुठेही घात होऊ शकतो, हेच वास्तव आहे. तेच सुरूवातीच्या 20 दिवसांत लोकांनी आपल्या जिल्ह्यात समजून घेतलेले नाही, असेच म्हणावे लागेल.

संदर्भ : केसरीराज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *