जिल्ह्यातील कॉलेज सुरू करण्यासाठी विद्यापीठ निर्णयाच्या प्रतीक्षेत

Jalgaon जळगाव माझं खान्देश

जळगाव प्रतिनिधी ::> कोरोनामुळे सात महिन्यांपासून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये बंद आहे. यूजीसीने १ नोव्हेंबरपासून विद्यापीठे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, महाराष्ट्र शासनाकडून पत्र आल्यानंतरच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सुरू करण्याबाबत निर्णय होणार असल्याने विद्यापीठ शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे विद्यापीठे, शैक्षणिक संस्था बंद केल्या होत्या. विद्यापीठांची वसतिगृहे ही मार्च महिन्यातच रिकामी केली होती.

३० जूनपासून राज्य सरकारने काही निर्बंध शिथिल करत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेत बोलवले होते. मात्र शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालये अद्यापही बंदच आहे.

१ नोव्हेंबर २०२०पासून नवे शैक्षणिक वर्ष जाहीर करावे, असे यूजीसीने जाहीर केले आहे. मात्र, विद्यापीठ व महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य शासनाचे पत्रक अद्याप प्राप्त झालेले नसल्याने १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार नाहीत.