निंभोरा-विवरा रस्त्याची वर्षभरात अवस्था बिकट

NIMBHORA रावेर सावदा

निंभोरा प्रतिनिधी ::> येथील सबस्टेशन मार्गे असलेल्या विवरा रस्त्याच्या काही भागाची अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

मागील वर्षी जिल्हा परिषदेमार्फत या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, गुणवत्तेबाबत ओरड असल्याने अवघ्या वर्षभरात रस्त्यावरील खडी निघाली. आता रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

गावाच्या सुरुवातीला असलेल्या रस्त्यात पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा आकार देखील वाढला आहे. वर्षभरात त्या रस्त्याची वाताहत झाल्याने तातडीने दुरुस्तीची गरज अाहे.

सोबत या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे व मोठे गवत वाढले असून त्यांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. दुतर्फा वाढलेल्या झुडपांसह रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत अाहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे. दरम्यान, बागायती आणि केळीबेल्टचा परिसर असल्याने या रस्त्यावरून कायम अवजड वाहनांची वर्दळ असते.

मात्र, जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांची ने-आण, शेतमालाची वाहतूक करताना शेतकरी, व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.