रिड जळगाव टीम ::> जळगाव शहरातील निलकमल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिलेचा व्हेंटीलेटर अभावी मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आज दुपारी रुग्णालयात जोरदार तोडफोड केली. तर दुसरीकडे रुग्णाची प्रकृती पहिल्या दिवसापासून गंभीर होती. याबाबत नातेवाईकांना कल्पना दिली असल्याचा खुलासा हॉस्पिटलने केला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील संगिता पांडूरंग पाटील (वय ५०, रा. जिल्हा बँक कॉलनी) यांची प्रकृती खरब झाल्यानंतर त्यांना २९ सप्टेंबर रोजी निलकमल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोनाचा दुसरा रिपोर्ट उद्या १२ ऑक्टोबर रोजी येणार होता. परंतू आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास संगिता पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूची बातमी कळताच मुलगा महेंद्र पाटील यांने आक्रोश केला. थोड्याच वेळात मयत महिलेचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयाची तोडफोड करायला सुरुवात केली.
नातेवाईकांचा आरोप होता की, रूग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता होती. परंतू डॉक्टरांनी फक्त ऑक्सिजनवर ठेवले. यावेळी नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रूग्णांना ऑक्सीजन पुरवठा करणारे ऑक्सीजन सिलेंडर काढून फेकल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
तर संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आईचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मुलगा महेंद्र पाटील यांच्यासह नातेवाईकांनी घेतला आहे. याबाबत ची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी भेट देवून गोंधळ शांत केला.