आमच्या नादी लागू नको, तुला यूपी-बिहार-एमपीतील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून जीवे मारून टाकू ; माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकाकडून लोढा यांना धमकी

Jalgaon जळगाव जामनेर

पोलिस अधीक्षकांना प्रफुल्ल लोढांचे निवेदन; रामेश्वर नाईक यांच्यावरही आरोप, संरक्षणाची मागणी

माजी मंत्री गिरीश महाजनांकडून जीविताला धोका

रिड जळगाव टीम ::> भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री गिरीश दत्तात्रय महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर पुनमचंद नाईक यांच्यापासून आपल्या जीवितास धोका आहे. त्यामुळे मला व कुटुंबीयांना शासनाच्या वतीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन नुकतेच जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे.

प्रफुल्ल लोढा यांनी या विषयासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना जामनेर पोलीस निरीक्षकांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, माजीमंत्री गिरीश महाजन व त्यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यापासून माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे.

याबाबत मी १८ जून रोजी पोलीस अधीक्षक तसेच मुख्यमंत्री यांना तक्रार अर्ज सादर केला आहे. गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून मी माझ्या काही हितचिंतकांकडून वर्गणी गोळा करून पोलीस बंदोबस्त घेतला आहे. परंतु, आता मला पोलिस बंदोबस्तासाठी पैसे भरणे शक्य नाही. त्यामुळे मला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा.

रामेश्वर नाईक यांनी ३० व ३१ जुलै रोजी व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे कॉल करून आमच्या नादी लागू नको, आमचे खूप मोठ्या लोकांशी संबंध आहेत. तुला मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच बिहारमधील गुंडांमार्फत किंवा वाहनाने अपघात करून जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली, असेही प्रफुल्ल लोढा यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, लोढा यांनी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक यांच्यासोबतच नाईक यांचे नातेवाईक तसेच काही अधिकाऱ्यांची देखील नावे निवेदनात घेतली असून, त्यांच्यापासून जीवितास धोका असल्याचे म्हटले आहे.

गैरव्यवहाराचे आरोप
या निवेदनात प्रफुल्ल लोढा यांनी गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्यावर निरामय फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याचाही आरोप केला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात दिला बोलण्यास नकार.
प्रफुल्ल लोढा यांनी मंत्री गिरीश महाजनांवर जे अाराेप केले अाहेत, त्या संदर्भात मंत्री महाजन यांना याविषयी विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *