‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’च्या नोटीसची चर्चा

Politicalकट्टा कट्टा जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव प्रतिनिधी >> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाच्या वेळी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’, असा ईशारा भारतीय जनता पक्षाला देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सक्त वसुली संचालयाने (ईडी) तीन दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे. त्या संदर्भात अधिकृत दुजोरा मात्र मिळाला नाही. दरम्यान, अजून तरी आपल्याला नोटीस मिळालेली नाही. मिळाल्यानंतर आपण त्या संदर्भात बोलू, असे खडसे यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वीच (२३ ऑक्टोबर) एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्याच्या वेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांनी भाषण केले होते. त्यावेळी ‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ असे वक्तव्य त्यांनी भाजपला उद्देशून केले होते. ही कथित सीडी त्यांचे कट्टर विरोधक बनलेल्या आमदार गिरीश महाजन यांच्या संदर्भात होती, असे सांगण्यात येत होते.

मात्र, ती सीडी ज्यांच्याकडे आहे असे खडसे सांगत होते त्या प्रफुल्ल लोढा यांनी शुक्रवारीच अशी काही सीडी आपल्याकडे नाही, असे स्पष्ट करीत खडसे यांच्यावरच गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्या पाठोपाठ ईडीने खडसे यांना नोटीस दिल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. काही वृत्तवाहिन्यांनी सुत्रांच्या हवाल्याने त्या संदर्भात वृत्त देखील प्रसारीत केले.